esakal | देहर्जे येथे दुर्मिळ कॉमन हॉक कुक्कु (पावशा) पक्षाला जिवदान
sakal

बोलून बातमी शोधा

bird

देहर्जे येथे दुर्मिळ कॉमन हॉक कुक्कु (पावशा) पक्षाला जिवदान

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील देहर्जे येथील रेसो विला येथील एका बंगल्या मध्ये पावशा (कॉमन हॉक कुक्कु) हा पक्षी अडकलेल्या आढळला. कावळ्यांच्या हल्ल्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी तिथे आश्रय घेतला होता. या हल्ल्यात काही पिसे गमावल्यामुळे उडण्यास असमर्थ झाल्यामुळे मांजर, कुत्रा तसेच इतर प्राण्यांचे सहज भक्ष्य ठरला असता पण ऋषिकेश शेळका व अनिकेत शेळका याने त्वरित त्या ठिकाणी जाऊन त्याला वाचवले. त्याच्या प्रकृती मध्ये आता बऱ्यापैकी सुधार झाला आहे आणि एक दिवसात उडायला समर्थ झाल्यावर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.

पावशा हा आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका, भूतान इ. देशांमध्ये आढळतो. भारतात समुद्रसपाटीपासून सु. 1000 मी. उंचीपर्यंत तो सर्वत्र सापडतो. तो एकाच जागी राहणारा व निवासी पक्षी आहे; परंतु उंच तसेच शुष्क प्रदेशात राहणारे हे पक्षी लगतच्या प्रदेशांत स्थलांतर करताना दिसतात. तो शिकरा या पक्ष्यासारखा दिसतो. पावशा आकाराने कबुतराएवढा पण त्यापेक्षा सडपातळ आणि जास्त लांब शेपटी असलेला पक्षी आहे. शरीराची लांबी सु. 34 सेंमी. असते. पाठ करड्या रंगाची असून पोटाकडचा भाग पांढरट असतो आणि त्यावर आडव्या पिंगट रेषा असतात. शेपटीवर तांबूस पट्टे असतात. डोळ्यांभोवती असलेल्या पिवळ्या वर्तुळांमुळे तो सहज ओळखता येतो. नर मादीपेक्षा आकाराने मोठा असतो. प्रामुख्याने वड, पिंपळ, अंजीर, बोरे व इतर वृक्षांची फळे आणि कीटक हे पावशा पक्ष्याचे अन्न असते.

हेही वाचा: शाळा, महाविद्यालये सुरु करा : सामाजिक संघटनांची मागणी

पावश्याला दुरून पाहिल्यास तो हुबेहूब शिकऱ्यासारखा दिसतो. त्याची उडण्याची व झाडाच्या शेंड्यावर उतरण्याची शैलीदेखील शिकऱ्यासारखी असते. उडताना आणि हालचाली करतानाही तो शिकऱ्याची नक्कल करतो. निसर्गातील अनुकारितेचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

पावशा सहजासहजी नजरेस पडत नाही. मात्र मार्च-एप्रिलच्या सुरुवातीपासून पावसाळा संपेपर्यंत नराचे ओरडणे सतत घातलेल्या शिळेमुळे जाणवते. त्याचे ओरडणे म्हणजे तार व कर्कश स्वरातील शीळ असते. या शिळेचा आवाज टिपेला पोचून शीळ अचानक बंद होते व थोड्याच वेळाने पुन्हा सुरू होते. ही मालिका सुरुवातीला संथ असून उत्तरोत्तर वाढत जाते आणि काही वेळा असह्य होते. त्यामुळे इंग्रजांनी त्याला ‘ब्रेनफीव्हर बर्ड’ हे नाव ठेवले आणि ते पुढे रूढ झाले.

मार्च–जुलै हा पावशाचा विणीचा हंगाम असतो. कोकिळेप्रमाणे हा पक्षी अंडपरजीवी आहे. पावशाची मादी सातभाई पक्ष्याची नजर चुकवून त्याच्या घरट्यात आपली अंडी घालते. एका घरट्यात ती बहुधा एकच अंडे घालते. आश्रयी सातभाई पक्ष्याच्या निळ्या अंड्यासारखीच पावशाची अंडी असतात. सातभाई पक्षी ती अंडी स्वत:चीच आहेत असे समजून त्यांच्यावर बसून ती उबवितो. त्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांचेही ते पोषण करतात. पिले मोठी झाली की ती उडून जातात. अशी माहिती Msc (प्राणीशास्त्र) चे शिक्षण घेतलेल्या पक्षी प्रेमी ऋषिकेश शेलका यांनी दिली.

loading image
go to top