युती, आघाडीला समान संधी!

Mumbai
Mumbai

काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपने हिसकावून घेतला असला तरी तो राखणे आव्हानात्मक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि युती न झाल्यास निर्माण झालेल्या आव्हानास कार्यात फारसा दाखवू न शिकलेला भाजप कसे तोंड देणार हा प्रश्‍नच आहे.

या मतदारसंघातून २०१४ मध्ये लोकसभेसाठी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याविरोधात कोणीही लढण्यास तयार नव्हते; मात्र भाजपने पूनम महाजन यांना रिंगणात उतरवले आणि त्या पावणेपाच लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. पूनम यांना ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा प्रयत्न होता, असे बोलले जाते. या वेळी मात्र युतीचे ‘तळ्यात-मळ्यात’ आहे. अशातच ‘मोदी लाट’ही ओसरल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास काँग्रेसला पुन्हा गड ताब्यात मिळवण्याची संधी आहे; मात्र अंतर्गत गटबाजीवर ‘फुंकर’ घालण्याचे काम ज्येष्ठ नेत्यांना करावे लागेल.

मागील निवडणुकीत भाजपला ५६.६० टक्के, तर काँग्रेसला ३४.५१ टक्के मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत मात्र युती तुटली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीही स्वतंत्र लढले. यात भाजपला लोकसभेच्या तुलनेत अडीच लाख मते कमी मिळाली. त्यामुळे युती फिस्कटलीच तर आघाडीच्या माध्यमातून समविचारी पक्षांची मोट बांधून काँग्रेसला पुन्हा या मतदारसंघात ‘हात’ उंचावण्याची संधी आहे.

पूनम महाजन यांना मतदारसंघातील प्रश्‍न सोडवण्यात फारसे यश आलेले नाही. काँग्रेसकडे ढीगभर उमेदवार असले तरी एका गटाने ‘बाहेरच्या’ उमेदवाराचा हट्ट धरला आहे. यात माजी क्रिकेटपटू अझहरुद्दीन, राज बब्बर चर्चेत आहेत. प्रिया दत्त पुन्हा लढण्यास तयार नाहीत. काँग्रेसने स्थानिक उमेदवार दिल्यास परिस्थिती बदलू शकते. विद्याधर गोखले, नारायण आठवले, मनोहर जोशी या मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे शिवसेनेलाही काँग्रेस व भाजपप्रमाणेच विजयाची संधी आहे.

पक्षनिहाय संभाव्य उमेदवार
भाजप - पूनम महाजन, आशीष शेलार
काँग्रेस - नसीम खान, कृपाशंकर सिंह, नगमा, राज बब्बर, अझहरुद्दीन
शिवसेना - आमदार अनिल परब, राज्यसभा खास.अनिल देसाई

२०१४ मधील मतविभाजन
पूनम महाजन (भाजप) -     ४,७८,५३५ (विजयी)
प्रिया दत्त (काँग्रेस) -     २,९१,७६४
फिरोज पालखीवाला (आप) -     ३४,८२४
आनंदराव शिंदे (बसप) -     १०,१२८

मतदारांतील नाराजीची कारणे
मुंबईत गोळा होणाऱ्या कचरा प्रश्‍नाशी संबंधित खार पम्पिंग स्टेशन १० वर्षांपासून रखडलेले 
हार्बर व मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक कुर्ल्यात पावसाळ्यात नेहमीच पाणी तुंबते
कुर्ला ते वांद्रे व्हाया ‘बीकेसी’मार्गे प्रवासात वाहतुकीची समस्या कायम 
सांताक्रूझ विमानतळानजीकच्या परिसरात झोपड्यांत वाढ. 
विलेपार्ले, सांताक्रूझ, वाकोला साकीनाका येथील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न रखडला
वांद्रे, बेहरामपाड्यात बहुमजली झोपडपट्ट्या. वारंवार आगीच्या दुर्घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com