चिंता वाढवणारी बातमी; मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच

भाग्यश्री भुवड
Sunday, 21 February 2021

मुंबईत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकंवर काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत रुग्णवाढ सुरूच असून शनिवारी 897 नवे रुग्ण सापडलेत.

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकंवर काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत रुग्णवाढ सुरूच असून शनिवारी 897 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख18 हजार 207 झाली आहे. काल 571 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 99 हजार 6 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत मृत्यूदर मात्र अद्याप नियंत्रणात असून काल केवळ 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11 हजार  438 इतका झाला आहे. 

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर 371 दिवसांवर गेला आहे. कोविड रुग्णवाढीचा दर 0.19 इतका आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 31 लाख 17 हजार 294 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी 1 पुरुष तर 2 महिला होत्या. मृतांपैकी सर्व रुग्णांचे वय  60 वर्षा वर होते.

मुंबईत 93 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1,305 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 4,603 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 402 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai corona cases updates surge bmc issue guidelines


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai corona cases updates surge bmc issue guidelines