esakal | Mumbai Corona : मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर स्थिर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Corona : मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर स्थिर

Mumbai Corona : मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर स्थिर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शहरात गेल्या दहा दिवसांत कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे. १० ते १९ सप्टेंबरच्या तुलनेत २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान चाचण्यांच्या संख्येत २८ टक्के वाढ झाली आहे, तर पॉझिटिव्हिटीच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. पालिका अधिकाऱ्यांच्या मते रुग्णांमध्ये फारशी वाढ होणार नाही. मुंबईत कोविड चाचण्यांची संख्या कमी झाल्यानंतर तज्ज्ञांनी महापालिकेला अधिकाधिक चाचण्या करण्याचा सल्ला दिला. कोविडची तिसरी लाट मुंबईत येईल की नाही हे सांगणे कठीण आहे; परंतु सध्याची परिस्थिती पाहता मुंबईतील कोविड साथ नियंत्रणात असल्याचे चित्र दिसत आहे. पालिकेतर्फे १० ते १९ सप्टेंबरदरम्यान ३,११,२८९, तर २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत ३,९८,५२६ चाचण्या केल्या. म्हणजेच गेल्या १० दिवसांत ८७,२३७ चाचण्या अधिक झाल्या आहेत, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाच्या रुग्णांमध्ये फारशी वाढ होणार नाही. आगामी काळात ५०० पर्यंत किंवा जास्तीत जास्त ६०० पर्यंत रुग्ण सापडू शकतात. अनेक नागरिकांचे लसीकरणही झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे जास्त त्रास होणार नाही; मात्र विषाणूचा नवीन प्रकार आला तर काय होईल, अशी चिंता तज्ज्ञांना आहे.

पॉझिटिव्हिटी दर सारखाच

मुंबईत वाढत्या चाचण्या असूनही कोरोनाच्या रुग्णांमध्ये फारशी वाढ झाली नाही. १० ते १९ सप्टेंबरपर्यंत मुंबईत ३७६८ (१.२ टक्के) नवीन रुग्ण आढळले, तर २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत ही संख्या ४८९० वर पोहोचली तरी पॉझिटिव्हिटी दर (१.२ टक्के) सारखाच आहे.

मुंबईत सध्या आम्ही दररोज सुमारे ४० हजार नागरिकांची कोरोना चाचणी करतो. ही चांगली गोष्ट आहे की संसर्ग झालेल्यांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. दर स्थिर आहे; मात्र आता आपण काही दिवस सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोविड नियमांचे पालन केले पाहिजे. लसीकरणाचा परिणामही दिसून येत आहे.

- डॉ. दक्षा शहा, महापालिका उपकार्यकारी आरोग्य अधिकारी

मुंबईतील खासगी प्रयोगशाळांमध्येही कोविड चाचण्या केल्या जातात. येथेही चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला किमान एक हजारहून अधिक चाचण्या केल्या जातात. त्यांचा अहवाल त्याच दिवशी ९ वाजेपर्यंत दिला जातो. शिवाय पालिकेकडेही त्याचा अहवाल पाठवला जातो. जेणेकरून एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर तत्काळ उपचार सुरू केले जाऊ शकतील.

- डॉ. विक्रांत सणगर, पॅनाशिया केअर डायग्नोस्टिक

चाचण्या वाढल्या, रुग्णांत घट

मुंबईत शनिवारी कोरोना चाचण्यांच्या संख्येने ४१ हजारांचा आकडा ओलांडला; परंतु संक्रमित लोकांची संख्या केवळ ४०५ आढळली आहे. राज्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २६९६ नवीन कोविड रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे शनिवारी ४९ लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा मृत्यू मुंबईत झाले. राज्य आणि मुंबई दोघांची रिकव्हरी सध्या ९७ टक्क्यांच्या वर आहे.

मुंबईची आकडेवारी

एकूण चाचण्या - १०४,३३,४३७

एकूण सक्रिय रुग्ण - ७,४३,८१९

एकूण मृत्यू - १६,१२२

पूर्णपणे बरे झालेले - ७,२०,४८७

दुपटीचा दर - ११६९ दिवस

loading image
go to top