कोरोनाचं पुन्हा वादळ! मुंबई पालिका अलर्ट मोडवर, हजारांहून अधिक इमारती सील

समीर सुर्वे
Sunday, 21 February 2021

मुंबईतील रुग्णांपैकी ८० ते ९० टक्के रुग्ण हे इमारतींमध्ये राहणारे असल्याचे पालिकेच्या पाहणीत आढळले आहे.

मुंबई:  कोविडने पुन्हा इमारतीभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील रुग्णांपैकी ८० ते ९० टक्के रुग्ण हे इमारतींमध्ये राहणारे असल्याचे पालिकेच्या पाहणीत आढळले आहे. तर गेल्या दोन दिवसात रुग्ण आढळलेल्या इमारतींची संख्या तिप्पट वाढली आहे.

सर्वसामान्यांसह निर्बंधासह लोकल सुरु झालेली असताना नागरिकांमध्ये बेफीकीरी वाढली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला रोज ३०० ते ३५० कोविडचे रुग्ण आढळत होते. आता ही सरासरी ८०० च्या पुढे गेली आहे. या रोज आढळणाऱ्या रुग्णांमध्ये ८० ते ९० टक्के रुग्ण हे इमारतींमधील असल्याचे पालिकेच्या पाहणीत आढळले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ३२१ इमारतीमध्ये रुग्ण होते. आज ही संख्या १ हजारच्यावर पोहचली आहे. पूर्वी १० रुग्ण एकाच इमारतीत आढळल्यास इमारत सील केली जात होती. आता पाच रुग्ण आढळल्यास इमारत सील केली जात आहे. त्यामुळे सील इमारतींच्या संख्येत वाढ होऊ लागली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्यासाठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्वाधिक सील इमारती या मुलूंड टी प्रभागात २३३ इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळले आहेत. त्या खोलोखाल कांदिवली पी दक्षिण आणि घाटकोपर एन प्रभागात १२५ इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळले आहेत. कुर्ला एल प्रभागात फक्त एका इमारतीत कोविडचे रुग्ण आहेत. मुलूंड मधील ५१४ रुग्णांवर उपचार सुरु असून कांदिवलीतील २३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा- इंधनवाढीचा भडका! भविष्यातही इंधन दरवाढ सुरुच राहणार, अर्थतज्ज्ञांचा इशारा

 ११ प्रभागात एकही वस्ती, चाळ प्रतिबंधित नाही. भांडूप आणि घाटकोपर मध्ये १० आणि कुर्ला येथे आठ वस्त्या, चाळींमध्ये कोविडचे रुग्ण आहेत. 

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona Virus Cases Updates news bmc sealed more than thousand buildings


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Corona Virus Cases Updates news bmc sealed more than thousand buildings