मुंबईकर, जाणून घ्या तुमच्या शहरातील कोरोनाची परिस्थिती

पूजा विचारे
Sunday, 9 August 2020

मुंबईत कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. अवघ्या १५ दिवसांमध्ये उत्तर मुंबईत रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात ३० टक्क्यांनी घट झाली.

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. एकेकाळी मुंबई शहर हे कोरोनाचं केंद्र ठरलं होतं. मात्र आता आनंदाची गोष्ट म्हणजे मुंबई शहर हे कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. लॉकडाऊन केल्यानंतर उत्तर मुंबईतील कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील इमारतींमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती. मात्र मुंबई महापालिकेनं रहिवाशांबरोबरच दुकानदार आणि फेरीवाल्यांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांमध्ये उत्तर मुंबईत रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात ३० टक्क्यांनी घट झाली.

मुंबईमधील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही सरासरी ८९ दिवसांवर पोहोचला आहे. शनिवारी एक हजार ३०४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. दिवसभरात ५८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार ४५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार ३३१ वर पोहोचली आहे. मात्र त्यापैकी ९५ हजार ३५४ रुग्ण बरे झालेत. कोरोनामुळे आतापर्यंत सहा हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य परिस्थितीत १९ हजार ९३२ कोरोनारुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर कोरोना रुग्ण सापडल्यामुळे मुंबईत ५८२ प्रतिबंधित क्षेत्रे असून पाच हजार ३९६ इमारती सील आहेत.

हेही वाचाः गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 'ही' आनंदाची बातमी, नक्की वाचा

मुंबईत कोरोना व्हायरसच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश येऊ लागलं आहे. सद्यपरिस्थितीत कांदिवली, बोरिवली, दहिसर या तिन्ही उपनगरांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३ हजार ७९४ वर पोहोचली आहे. यापैकी १० हजार ३०३ जण कोरोनामुक्त झालेत. दोन हजार ८४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या परिसरातील ६४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे एक हजार २४० इमारती सील असून ६१ परिसर प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आलेत. 

अधिक वाचाः तलाव क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरु; 49 टक्के पाणीसाठा जमा

mumbai corona virus updates doubling rate 89 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai corona virus updates doubling rate 89 days