esakal | Mumbai Covid 19: कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई बेहाल

बोलून बातमी शोधा

mumbai covid second wave
Mumbai Covid 19: कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई बेहाल
sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: कोविडची दुसरी लाट आता स्थिरावू लागली असली तरी गेल्या 71 दिवसात या दुसऱ्या लाटेनं मुंबई बेहाल झाली होती. गेल्या वर्षीच्या मार्चपासून आतापर्यंत मुंबईत नोंदवलेल्या कोविड रुग्णांपैकी तब्बल 46 टक्के रुग्ण गेल्या 71 दिवसात नोंदविण्यात आले आहेत.

जानेवारीपर्यंत कोविडची पहिली लाट आटोक्‍यात आली होती. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही अधिक वेगानं होऊ लागली. त्यावर महानगर पालिकेनं कोविड चाचण्याची संख्या वाढवली. काही वेळा तर दिवसाला दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. आता पुन्हा ही दुसरी लाट स्थिरावू लागली आहे. मात्र गेल्या 70 दिवसात या लाटेनं मुंबईत कहर केला होता. गेल्या वर्षीच्या 11 मार्च रोजी मुंबईत पहिल्या कोविड रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर या वर्षीच्या 11 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत 3 लाख 13 हजार रुग्ण आढळले. 12 फेब्रुवारीपासून 20 एप्रिलपर्यंत मुंबईत 2 लाख 73 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोविडमुळे मुंबईत 12 हजार 347 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूदर नियंत्रणात

या 71 दिवसात कोविडचे रुग्ण वेगाने वाढले. पण कोविडचा मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आले आहे, असा दावा महानगर पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी केला. या काळातील मृत्यूदर 0.003 टक्‍क्‍यांवर आला आहे. दिवसाला 13 ते 14 जणांचे मृत्यू होत आहेत, असा दावाही चहल यांनी केला.

माझे कुटूंब माझी जबाबदारी, मी जबाबदार ही मोहिम तसेच सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. वेळीच चाचण्या करुन विलगीकरण, उपचार यामुळेही फायदा झाला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा: Corona Virus: मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा 6 लाखांच्या पार

एकूण मृत्यूदर 2 टक्‍क्‍यांवर

मुंबईत कोविडचा मृत्यूदर 2 टक्‍क्‍यांवर आणण्यात महानगर पालिकेला यश आले आहे. हा मृत्यूदर पहिल्या लाटेच्या वेळी 5.8 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचला होता, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. वेळीच आणि योग्य पध्दतीने उपचार मिळत असल्याने मृत्यूदर नियंत्रणात येत आहे.

हेही वाचा: Maharashtra Lockdown: फक्त 'या' लोकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा

गेल्या 71 दिवसात काय झाले

कोविड राखीव बेड्‌स 12 हजार 10 वरुन 20 हजार 641 वर आणले.

मृत्यूदर 3.63 टक्‍क्‍यांवरुन 2 टक्‍क्‍यांवर आणण्यात यश

747 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराधिन रुग्ण 80 हजारांनी वाढले.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai covid second wave 46 percentage patients in 71 days