
तरुणाच्या हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, दुसरीकडे भावाकडून भावाची हत्या
मुंबई : शहरात दोन वेगवेगळ्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. एकाच दिवशी मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात झालेल्या दोन जणांच्या हत्येनंतर शहर हादरले आहे. शहरातील अँटाॅप हिल (Antop Hill) येथे तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी मध्यरात्री हा गुन्हा घडला असून सोमवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर दुसऱ्या घटनेत भावानेच सख्ख्या लहना भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे.
अब्दुल याला काही जणांनी केंद्रीय लोक निर्माण विभागाच्या गोडावून मागे सेक्टर १ येथे बोलावले त्या ठिकाणी त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव अब्दुल सलाम मुनावर अली सय्यद २९ असे आहे. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, अज्ञात आरोपी ऐवढ्यावरच न थांबता बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अब्दुलला ज्वलनशील पदार्थाने पेटवून आरोपीनी पळ काढला. या प्रकरणी अँटाॅप हिल पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
मित्रासाठी सख्ख्या लहान भावाचा खून
तर दुसऱ्या घटनेत एका सख्या भावानेच लहान भावाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना काळचौकी परिसरात घडली आहे. मोठ्या भावाच्या मित्राला लहान भावाने केलेल्या दमदाटीचा राग अनावर झाल्याने त्याने ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. लालबागच्या चिवडा गल्ली परिसरात ही घटना घडली असून यात आकाश भरूगडे याचा मृत्यू झाला आहे.
रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. हे दोघंही भाऊ काळाचौकच्या जीडी आंबेकर मार्ग, आंबेवाडी येथील राहणारे आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अशोक भरूगडे, वय ३० याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिस अधिक तपास करत आहेत.