
Mumbai News : मुंबईच्या कुर्ला भागात कपाडिया 2 अज्ञातांकडून महापालिका कंत्राटदारावर गोळीबार; तपास सुरू
मुंबई : मुंबईतील कुर्ला कापडिया नगर परिसरात सोमवारी रात्री सुरज प्रताप सिंह देवरा नामे मुंबई महापालिका कंत्राटदारावर गोळीबार करण्याची घटना समोर आली आहे. कामावरुन घरी परतत असताना दोन अज्ञात मारेकऱ्यांनी सूरज सिंह यांच्यावर गोळीबार केला.
या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी भादंवि कलम 307, 34 आणि शस्त्रास्त्र बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथकाची स्थपना करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. दहिसर येथे वास्तव्यास असलेला कंत्राटदार सुरज प्रताप सिंह देवरा यांच्यावर सोमवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला.
मात्र, सुदैवाने सुरज सिंह यांना गोळी लागली नाही. सुरज यांच्या दिशेने झाडलेली गोळी त्यांच्या मोटरगाडीला लागली. त्यानंतर सुरज सिंह तेथून आपल्या मोटरगाडीमधून निघून गेले. वाकोला पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले. हल्ला नेमका का करण्यात आला होता या मागे आर्थिक व्यवहार आहे की इतर काही कारणे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.