esakal | १२५ कोटींचे हेरॉईन जप्त; उरणमध्ये डीआरआयची मोठी कारवाई | Drugs
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs-Heroin

१२५ कोटींचे हेरॉईन जप्त; उरणमध्ये डीआरआयची मोठी कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उरण : क्रूझवरील ड्रग्जप्रकरणाची (Cruise drug case) चर्चा सुरू असतानाच उरणमधील जेएनपीटी बंदरात (JNPT Port) तब्बल १२५ कोटी रुपयांचे २५ किलो हेरॉईन (heroin drug) सापडल्याने खळबळ उडाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाने छापा मारून बंदरातील एका कंटेनरमधून हे ड्रग्स जप्त केले आहेत. याप्रकरणी नवी मुंबईतील व्यापारी जयेश सांघवी याला (६२) अटक (culprit arrested) करण्यात आली आहे.

हेही वाचा: Mumbai : साकिनाका येथे तरुणीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

आरोपी सांघवी हा इराणमधून शेंगदाणा तेलाची आयात करतो. अशाच एका खेपेत त्याने हेरॉईन लपवून आणल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर डीआरआयने छापा टाकला असता हा प्रकार समोर आला. याबाबत डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘वैभव एंटरप्रायजेसचे संदीप ठक्कर यांच्या कंटेनरमधून हे हेरॉईन जप्त केले आहेत. डीआरआय टीमने त्यांचीही चौकशी केली.

गेल्या १५ वर्षांपासून ते आरोपी सांघवीसोबत व्यवसाय करत होते. इराणमधून वस्तू आयात करण्यासाठी सांघवीने त्यांना चांगली आॅफर दिली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून हा माल आणण्याची परवानगी ठक्कर यांनी दिली. ठक्कर यांनाही यात ड्रग्स असल्याची माहिती नव्हती.’ आता डीआरआयचे पथक जेएनपीटी बंदरावरील इतर काही कंटेनरचीही तपासणी करत आहेत. जप्त केलेले हेरॉईन जेएनपीटी बंदरातील कुठल्या यार्डमध्ये सापडले, याची अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

११ आॅक्टोबरपर्यंत कोठडी

डीआरआयने आरोपी जयेश सांघवीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला गुरुवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत डीआरआयची कोठडी सुनावली आहे.


क्रूझवरील ड्रग्जप्रकरणाशी कनेक्शन?

क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणावरून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एकामागोमाग अमली पदार्थांचे साठे सापडत आहेत. जेएनपीटी बंदराच्या परिसरात जप्त केलेल्या हेरॉईनचाही क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असू शकतो, अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.

loading image
go to top