esakal | मुंबई: मेट्रो कारशेड आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे अखेर मागे
sakal

बोलून बातमी शोधा

metro kadshed

मुंबई: मेट्रो कारशेड आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे अखेर मागे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीसाठी झाडं तोडण्यास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेण्याचे निर्देश गृह विभागाला दिले. त्यामुळे 29 आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले असून पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा: दिड वर्षानंतर पोलीस बदल्यांना मुहूर्त; ८५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

मेट्रो कारशेडसाठी 4 ऑक्टोबर 2019 ला रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू असताना त्याला विरोध करायला गेलेल्या पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी 29 जणांवर कलम 353 अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे होते. गंभीर गुन्हे दाखल झाल्याने विद्यार्थ्यांना नोकरीस आणि पासपोर्ट काढण्यासाठी अडचणी येत होत्या.

महाविकास आघाडीचे सरकार येताच डिसेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरे येथे होणाऱ्या कारशेडला स्थगिती देत आरे वाचवणार असल्याचे सांगितले. आरे वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवरील केसेस देखील मागे घेण्यात आल्याचे आदेश दिल्याचे ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आग्रही होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर अंमलबजावणीसाठी आंदोलकांना दीड वर्ष वाट पाहावी लागली.

हेही वाचा: पनवेल रेल्वे स्टेशनवर खेचली चैन; नातेवाईक आणि पोलिसांमध्ये जूंपली

आरेमध्ये वृक्ष तोडीच्या विरोधात आंदोलन केलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी विनंती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रीमंडळातील इतर सदस्यांनीही आदित्य ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेच्या आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्याची कार्यवाही करावी असे आदेश गृह विभागाला दिले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रथम आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आणि त्यानंतर आरेतील 29 जणांवर दाखल केले गुन्हे मागे घेऊन पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर पुढे अंमलबजावणी लांबली होती.

प्रतिक्रिया

अडीच वर्षे आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. आता सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने आम्हाला करियरवर लक्ष केंद्रित करता येणार आहे. -आदित्य पवार, आंदोलक

गुन्हे मागे घेतल्याने आम्हाला रिलीफ मिळाले आहे. आम्ही सर्वच अंदोलकांना त्रास सहन करावा लागत होता. सरकारने आपले आश्वासन पाळले यासाठी त्यांचे ही आभार. -श्रुती नायर, आंदोलक

loading image
go to top