Mumbai : डहाणू रोड ते विरार चौपदरीकरण प्रकल्पाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road

Mumbai : डहाणू रोड ते विरार चौपदरीकरण प्रकल्पाला गती

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू रोड ते विरार दरम्यान उपनगरी लोकल फेऱ्यात वाढ व्हावी. तसेच येथील दैनंदिन प्रवास करणार्‍या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा. याकरिता विरार ते डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता. मात्र, भूसंपादसाठी लागणार विलंब आणि कोरोनामुळे ह्या प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे; मात्र, कोरोनानंतर या प्रकल्पाने गती पकडली असून ८० टक्के भूसंपादन झाले आहे. या प्रकल्पातील वैतरणा नदीवरील सर्वाधिक मोठ्या पुलाचे काम फास्ट ट्रकवर सुरु आहे, त्यामुळे २०२५ पर्यत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेचा मार्गावरील विरार-डहाणू रोड सर्वाधिक व्यग्र विभाग असून पश्चिम रेल्वेच्या या मार्गावरून मेल-एक्स्प्रेस धावतात. येथे मालगाड्यांचे प्रमाणही अधिक आहे. यामुळे सद्यस्थितीत जेमतेम लोकल फेऱ्या या मार्गावर होतात. एमयूटीपी प्रकल्पाअंतर्गत या मार्गावर उपनगरी लोकल फेऱ्यात वाढ व्हावी. तसेच येथील दैनंदिन प्रवास करणार्‍या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा. म्हणून रेल्वे विकास महामंडळाच्या ‘एमयूटीपी ३’ प्रकल्पामध्ये विरार-डहाणू रेल्वेमार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पाला डिसेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने मंजुरी दिली. या विरार-डहाणू चौपदरीकरणासाठी ३ हजार ५७८ कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. एकूण ६४ किमीच्या या मार्गावर आठ स्थानके असणार आहे.

८० टक्के भूसंपादन पूर्ण -

डहाणू रोड ते विरार चौपदरीकरण प्रकल्पासाठी एकूण १८० हेक्टर जमीन आवश्यकता होती. यापैकी ८० टक्के जमिनींचे संपादित करण्यात आली आहे. २९.१४ हेक्टर खासगी जमीनपैकी २२. ६० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तर राज्य शासनाची जमीन १०. २६ जमीनपैकी ८. ३२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून ३. ७७ हेक्टर वन जमीन ताब्यात आली आहे. एकूण 30 गावांमध्ये भूसंपादन केले आहे. यात वसईतील ६ गावे, पालघरमधील २० गावे आणि डहाणूतील चार गावांचा समावेश असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

वैतरणा नदीवर पुलाचे काम युद्धपातळीवर -

या मार्गावर वैतरणा नदीवर वैतरणा आणि सफाळे दरम्यान दक्षिण वैतरणा पूल आणि उत्तर वैतरणा पूल हे दोन महत्त्वाचे पूल उभारण्याचे कंत्राट गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात देण्यात आले आहे. आता ९२ क्रमांचा पुलांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकर या पुलाचे काम पूर्ण होणार आहे.

विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पासाठी ८० टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे वैतरणा नदीवर असलेले महत्वपूर्ण पुलांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. टारगेटनुसार हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचे प्रयत्न सुरु आहे.

-सुनील उदासी,जनसंपर्क अधिकारी, एमआरव्हीसी

ग्राफिक्स -

असे आहे वैशिष्टय़े-

एकूण लांबी- ६४ किमी

मोठे पूल- १६

छोटे पूल- ६८

प्रकल्पासाठी मजुरी निधी -३५७८ कोटी

जून २०२२ पर्यत ४३१ कोटी खर्च

प्रकल्प पूर्ण करण्याचा टार्गेट - मार्च २०२५

प्रकल्पासाठी एकूण जमीन- १८०हेक्टर

२९.१४ हेक्टर खासगी जमीन

१०.२६ हेक्टर राज्य शासनाची जमीन

3.७७ हेक्टर वन जमीन

उर्वरित जमीन रेल्वेची

सद्याची कामाची प्रगती

- सल्लागाराची नियुक्ती

- वैतरणा नदीवरील पुल क्र. ९२ / ९३ कंत्राट दिले

-९२ क्रमांचा पुलाचे काम प्रगतीपथावर

-९ पुलांवर कामे प्रगतीपथावर आहे

- २२ पूल बांधून पूर्ण झाले.

- १६ मेजर पुलाचे डिझाईन मंजूर

- विरार - वैतरणासाठी स्टेशन इमारत,

सेवा इमारत,कर्मचारी निवासस्थान,

प्लॅटफॉर्म इत्यादी बांधकामाचे कंत्राट दिले.

आठ नवीन स्थानके-

या मार्गावर विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वाणगाव, डहाणू रोड स्थानके आहेत. त्यातील अंतर ८ ते १२ कि.मी. असल्याने चौपदरीकरणादरम्यान वैतरणा-सफाळेमध्ये दोन, सफाळे-केळवेदरम्यान एक, केळवे-पालघरमध्ये एक, पालघर-उमरोलीमध्ये एक, उमरोली-बोईसरमध्ये एक, बोईसर-वाणगावमध्ये एक, वाणगाव-डहाणू रोडदरम्यान एक अशी आठ नवी स्थानके बांधली जाणार आहे.