
दलित साहित्याने मराठी साहित्य विश्वात एक नवे आयाम निर्माण केले, नव्या जाणिवा जगासमोर मांडल्या. इतकेच नाही तर मराठी साहित्य विश्वाला एक वेगळी ओळख करून दिली.
Mumbai News : दलित साहित्याने मराठी साहित्य विश्वाला नवी ओळख करून दिली - ' उचल्या' कार लक्ष्मण गायकवाड
मुंबई - दलित साहित्याने मराठी साहित्य विश्वात एक नवे आयाम निर्माण केले, नव्या जाणिवा जगासमोर मांडल्या. इतकेच नाही तर मराठी साहित्य विश्वाला एक वेगळी ओळख करून दिली. परंतु आजही दलित साहित्याच्या संदर्भात भेदभाव केला जातो, तो साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून मांडून त्यासाठी उत्तर द्यावे असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक व 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी केले.
वरळी नेहरू सेंटर येथे सुरू असलेल्या राजकमल प्रकाशन समूहाच्या किताब उत्सवात ते भारतीय दलित साहित्य आणि भावी दिशा या विषयावरील परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, हिंदीचे ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल बिस्मिल्लाह आणि अविनाश दास आदी उपस्थित होते. यावेळी अब्दुल बिस्मिल्लाह यांनीही आपले प्रखर मते मांडली.
गायकवाड म्हणाले की, आमच्या साहित्याची भावी दिशा ही आमच्या लेखक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून सहित्याप्रती भेदभाव करणाऱ्यांना उत्तर दिले पाहिजे. त्यासाठी दलित, ग्रामीण, आदिवासी, भटके विमुक्त आदी घटकातील साहित्यिकांनी एकत्रितपणे यासाठी पुढाकार घेण्याची गरज गायकवाड यांनी व्यक्त केली.
शरण कुमार लिंबाळे म्हणाले की, आज देशात जातीवाद आणि त्याचे विष निर्माण करणारे वातावरण तयार करण्यात आल्याने दलितांना विविध स्तरावर भेदभाव आणि त्याचा सामना करावा लागत आहे. तर अब्दुल बिस्मिल्लाह म्हणाले, कोणत्याही साहित्याची आणि त्याच्या रचनेला कोणता धर्म नसतो. साहित्य हे साहित्य असते. भाषा, साहित्य आणि कला यावर कोणत्या एका घटकाचा अधिकार नसतो, ते प्रवाहित असतात. परंतु आज दुर्दैवाने भाषेला धर्माने जोडले जात आहे. परंतु कोणतीही भाषा ही त्या धर्माची नसते. असेही ते म्हणाले. आपल्या 'झीनी-झीनी बीनी चदरिया' या पुस्तकाबद्दल सांगताना बिस्मिल्लाह म्हणाले, हे पुस्तक लिहिताना मला मी काशीचा जुलाहा बनलो होतो.
विणकर आणि त्यांच्या वस्त्यांमध्ये राहताना त्यांच्या चरख्याचा आवाज, त्यांच्या सुत कताई चा आवाज मला खुणावत होता. त्यातील संगीत, त्यात सामावलेले विश्व मला त्यातील अंतर्नाद मला ऐकायला मिळत होता. त्यामुळेच माझ्या हातून हे पुस्तक लिहिले गेले असल्याचे ते म्हणाले.
पहिल्या सत्रात 'कोसला'कर डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या 'बिढार', 'हूल', 'जरीला' और 'झूल' या चार हिंदी आवृत्तीच्या पुस्तकाचे पुस्तकाचे अंबरीश मिश्र, जयप्रकाश सावंत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शेवटच्या सत्रात चित्रपट दिग्दर्शक आणि गीतकार गुलज़ार यांच्या नवीन आलेल्या 'जिया जले' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच 'आस पड़ोस' या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. दरम्यान, 'जिया जले' या पुस्तकावर गुलज़ार यांची नसरीन मुन्नी कबीर सोबत खुली चर्चा झाली. तर अभिनेते व नाटककार पीयूष मिश्रा यांच्याशी वाचकांना थेट संवाद साधण्याची यावेळी संधी मिळाली.