esakal | Mumbai : देशात प्रवासी चारचाकींच्या मागणीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai : देशात प्रवासी चारचाकींच्या मागणीत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची लाट ओसरल्याने देशात प्रवासी चारचाकी वाहनांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. उत्पादनात मात्र अजूनही तूट असल्याने यंदा प्रथमच सणासुदीला मोटारींवर फारसे ‘डिस्काउंट’ किंवा ‘ऑफर’ नसतील, अशी शक्यता वाहन विक्रेत्यांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनतर्फे (फाडा) ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांचे उत्पादन कमी केले आहे; मात्र सणासुदीच्या हंगामात वाहनांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गणेशोत्सव, नवरात्र, दसरा-दिवाळी या कालावधीत मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती येऊ शकते. त्यामुळे वाहन उत्पादक; तसेच विक्रेतेही मोटारींच्या किमतीवर फारसे डिस्काऊंट वा अन्य सवलती देणार नाहीत, अशी शक्यता ‘फाडा’ने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादी, वंचितचे पदाधिकारी भाजपमध्ये

गेल्या दोन वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील वाहनविक्रीची तुलना केल्यास, फक्त ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे; तर रिक्षा, टेम्पो-ट्रक आदींच्या विक्रीत घट झाली आहे. आता कोरोना साथीचे सावट कमी होत असल्याने सणासुदीच्या दिवसांत वाहनांना मागणी वाढण्याची अपेक्षा आहे; मात्र कमी पुरवठा ही चिंतेची बाब असल्याचे ‘फाडा’चे म्हणणे आहे.

मोटारींची विक्री दोन वर्षांपूर्वीच्या एक लाख ९२ हजारांच्या तुलनेत या वर्षी ३१ टक्के वाढून दोन लाख ५३ हजारांवर गेली आहे. ट्रॅक्टरची विक्रीही दोन वर्षांपूर्वीच्या ५२ हजारांवरून ७१ हजारांपर्यंत गेली आहे. २०१९ मध्ये एकूण सर्व वाहनांची विक्री १६ लाख २४ हजार, २०२० मध्ये १२ लाख नऊ हजार व २०२१ मध्ये १३ लाख ८४ हजार अशी आहे. सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री गेल्या वर्षीपेक्षा वाढली असली, तरी अजूनही ती कोविडपूर्व काळातील विक्रीच्या बरोबरीला आली नाही.

loading image
go to top