मुंबईचा विकास गतीने!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नवी मुंबई - एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईमध्ये तब्बल दीड लाख कोटींची विकासकामे हाती घेण्यात आली असून, मुंबईचा विकास अधिक गतीने होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

नवी मुंबई - एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईमध्ये तब्बल दीड लाख कोटींची विकासकामे हाती घेण्यात आली असून, मुंबईचा विकास अधिक गतीने होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

सरकारने स्थापन केलेल्या संस्थांचे पैसे बॅंकेत ठेवून त्यावरील व्याज खाण्यासाठी नसून, त्या पैशांचा वापर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो, उन्नत मार्ग अशा स्वरूपाची विकासकामे करण्यासाठी आहेत. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असून, त्यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे चालले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या २२ किलोमीटरच्या ट्रान्सहार्बर सी-लिंकचे काम सुरू केले आहे. यासोबतच मेट्रोचे देशातील सर्वात मोठे जाळे तीन वर्षांत तयार करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजन विचारे, महापौर जयवंत सुतार, आमदार सुभाष भोईर, मंदा म्हात्रे, संदीप नाईक, नरेंद्र पाटील, नगरसचिव प्रवीण दराडे, एमएमआरडीएचे आयुक्त ए. आर. राजीव, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, विजय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

कंटेनरची वाहतूक रोरोतून?
परदेशातून रोरो सेवा देशात पोहोचल्यावर पूर्व किनाऱ्यावरील जलवाहतूक सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ठाण्यात जलवाहतूक सुरू करायची असून कंटेनरची वाहतूक रोरो सेवेतून वळवण्यात येते का, याचीदेखील मेरिटाईम व एमएमआरडीएच्या माध्यमातून चाचपणी केली जाणार आहे. पुढील हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर एमएमआर क्षेत्रात अवघ्या तासात पोहोचता येणे शक्‍य होणार असल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.

कोपरी उड्डाणपूल ठाणेकरांची लाईफ लाईन
ठाण्यातील कोपरी नाका उड्डाणपूल व ऐरोली ते काटई उन्नत मार्गाचे भूमिपूजन या वेळी करण्यात आले. कोपरीवरील उड्डाणपुलामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. सत्तेत नसताना आम्ही या पुलासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र आत्ता ते पूर्णत्वास येत असून कोपरी पूल ठाणेकरांचे लाईफ लाईन ठरेल, असा विश्‍वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: mumbai development devendra fadnavis