संजय राऊत यांना आयोगाची नोटीस 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 एप्रिल 2019

शिवसेना खासदार संजय राऊत यांना आचारसंहितेचा भंग केल्याबाबत मुंबई जिल्हा निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 

मुंबई -  शिवसेना खासदार संजय राऊत यांना आचारसंहितेचा भंग केल्याबाबत मुंबई जिल्हा निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 

शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या "सामना' वृत्तपत्रात आक्षेपार्ह मजकूर छापल्याबाबत मुंबई जिल्हा निवडणूक आयोगाने ही नोटीस पाठवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या नोटिसीमुळे संजय राऊत अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. याबाबत संजय राऊत यांना 3 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत. 31 मार्च रोजीच्या "सामना' वृत्तपत्रात "रोखठोक' विषयाच्या लेखात ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला होता. यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. आचारसंहिता सुरू असताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख नोटिसीमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वीही 2017 मध्ये सामनावर तात्पुरती बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. भाजपच्या या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने "सामना'ला नोटीस बजावली होती. 

Web Title: Mumbai District Election Commission issued a notice to Sanjay Raut