मुंबई विभागाचा निकाल ९०.४१ टक्के; कोकणचा दबदबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. ८) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. या वर्षीही कोकण मंडळाने निकालातील दबदबा कायम ठेवला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.७० टक्के अधिक लागला आहे. तसेच गत वर्षीपेक्षा यंदा निकालाची टक्केवारी ०.६७ टक्‍क्‍याने वाढली आहे.  मुंबई विभागाचा निकाल ९०.४१ टक्के लागला आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. ८) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. या वर्षीही कोकण मंडळाने निकालातील दबदबा कायम ठेवला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.७० टक्के अधिक लागला आहे. तसेच गत वर्षीपेक्षा यंदा निकालाची टक्केवारी ०.६७ टक्‍क्‍याने वाढली आहे.  मुंबई विभागाचा निकाल ९०.४१ टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.३२ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे; तर मुंबई विभागात मुंबई पश्‍चिम उपनगर विभागाने बाजी मारली असून या विभागाचा निकाल ९२.२१ टक्के लागला आहे. 

दहावीच्या परीक्षेला नऊ विभागीय मंडळांतून एकूण १६ लाख ३६ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के लागला आहे; तर सर्वाधिक कमी निकाल ८५.९७ टक्के नागपूर विभागाचा लागला आहे. मंडळाने परीक्षा घेतलेल्या ५७ विषयांपैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यभरातून आठ लाख ८६ हजार १०६ मुले, तर सात लाख ४२ हजार ५०७ मुली परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी सात लाख ७३ हजार ३३९ मुले आणि सहा लाख ८२ हजार ८६४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थिनींचा निकाल ९१.९७ टक्के आहे, तर विद्यार्थ्यांचा निकाल ८७.२७ टक्के आहे.

राज्यातील १२५  विद्यार्थ्यांना १०० टक्के 
मुंबई, ता. ८ : दहावी परीक्षेत सुमारे १२५ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. लातूर विभागातील तब्बल ७० विद्यार्थ्यांनी या निकालावर मोहर उमटवत लातूर पॅटर्न हीट ठरवला आहे. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षी १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते. 

लातूर विभागातील ७० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद विभागातील २३ विद्यार्थ्यांना हे यश मिळाले आहे. पुणे विभागातील ४ विद्यार्थी, नागपूर २, मुंबई ४, कोल्हापूर ११, अमरावती ६, नाशिक १ आणि कोकण विभागातील ४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये मुंबई विभागातील डोंबिवली येथील चंद्रकांत पाटकर शाळेतील श्रुतिका महाजन आणि डोंबिवली येथील टिळकनगर शाळेतील रिद्धी करकरे यांचा समावेश आहे.

गणित, विज्ञान-तंत्रज्ञान कठीण
दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयासह गणित, विज्ञान-तंत्रज्ञान, सामान्य गणित आणि तमिळ हे विषय कठीण जात आहेत. मुंबई विभागाचा मराठीचा निकाल ८८.८९ टक्के लागला आहे; तर तमिळ ७९.७५, इंग्रजी ८८.५१, गणित ८७.८७, विज्ञान-तंत्रज्ञान ९१.३९, सामान्य गणित ७८.२७ असा निकाल लागला आहे. एकूण ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

पुरवणी परीक्षा  १७ जुलैपासून
दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यासाठी १७ जुलैपासून पुरवणी परीक्षा होणार आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात एक लाख ७२ हजार ४१० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये एक लाख १२ हजार ७६७ मुले, तर ५९ हजार ६४३ मुलींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून राज्य मंडळामार्फत २०१५ पासून पुरवणी परीक्षा घेण्यात येते. जुलै-ऑगस्ट २०१८ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

फेरपरीक्षेचा निकाल ४३.५४ टक्के
राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून एक लाख १४ हजार ४१ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख १३ हजार ७८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील ४९ हजार २३२ विद्यार्थी म्हणजेच ४३.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. खासगीरीत्या परीक्षेला बसलेल्या ४२ हजार ६४८ विद्यार्थ्यांपैकी ५१.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: Mumbai division is 9 0.41 percent ssc result