मुंबईकरांनो पुढच्या महिन्यापासून 'या' युद्धासाठीही तयार राहा, 'हे' आहेत हॉटस्पॉस्ट...

मुंबईकरांनो पुढच्या महिन्यापासून 'या' युद्धासाठीही तयार राहा, 'हे' आहेत हॉटस्पॉस्ट...

मुंबई- सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच मुंबईत या व्हायरसचा प्रार्दुभाव जास्त आहे. अशातच कोरोनाच्या संकटाचा सामना करतानाच मुंबई यावर्षी पुराच्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचं मुंबईत आगमन होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. त्यातच यंदाही मुंबईची तुंबई होणार असल्याची शक्यता आहे. महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी कामाची आखणी केली आहे. दरम्यान मुंबईत यंदा तब्बल 291 ठिकाणी पाणी तुंबू शकते, असा अंदाज महापालिकेनं व्यक्त केला आहे. 
 
हा अंदाज व्यक्त करत पालिकेनं त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या या ठिकाणांसह अन्य जागी पाणी उपसा करणारे सुमारे 350 हून अधिक पंप सज्ज ठेवण्यात येणारेत. कारण पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईतील नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. लॉकडाऊनच्या काळात कामगार मिळत नसल्यानं ही समस्या निर्माण झाली आहे.

नवनिर्वाचित आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोरोनासोबतच पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. या बैठकीत पर्जन्य जलवाहिन्या विभाग, मलनि:सारण विभाग, विद्युत आणि देखभाल विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला कामाला लागण्याचे आदेश त्यांनी सर्वांना दिलेत. तसंच गेल्यावर्षी तुंबलेल्या ठिकाणी यंदा पाणी तुंबू नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असंही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. 

सोमवारी चहल यांनी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि माहीम येथे जाऊन मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामाची पाहणी केली. मुंबई शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरातून वाहणाऱ्या मिठी नदीतून दरवर्षी 1.3 लाख मेट्रिक टन गाळ काढला जातो. यंदा हे काम आतापर्यंत 29 टक्के पूर्ण झाले आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी 70 टक्के काम पूर्ण करण्याचं महापालिकेचं नियोजन असल्याची माहिती आहे. नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे करण्यासाठी गरज भासल्यास कामगारांना दोन शिफ्टमध्ये कामाला लावा, असे आदेशही त्यांनी दिलेत.

पंपांसाठी पालिका 70 कोटी खर्च करणार 

यंदा 291 ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असल्यानं तुंबलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी 300 हून अधिक पंप सज्ज ठेवणार आहेत. तर पालिका यंदा पंपांसाठी 70 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. गेल्यावर्षी मुंबईत 225 ठिकाणी पाणी तुंबलं होतं. तेव्हा 298 पंप बसवण्यात आले होते. 

या ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता 

  • कुलाबा भाग- गणेशमूर्तीनगर, गीतानगर, आंबेडकरनगर
  • वरळी- वरळी कोळीवाडा, प्रभादेवी आदर्शनगर, गोमातानगर, पांडुरंग बुधकर मार्ग लोअर परळ, दीपक सिनेमागृह परिसर
  • माटुंगा- खोदादाद सर्कल दादर टीटी, कोरबा मिठागर, भीमवाडी वडाळा, रेनॉल्ड्स कॉलनी, शिवशक्तीनगर, वच्छराजनगर, मुख्याध्यापक भवन सायन, चुनाभट्टी बस डेपो, प्रतीक्षा नगर समाज मंदिर हॉल, हेमंत मांजरेकर मार्ग, गांधी मार्केट किंग्ज सर्कल
  • मालाड- मार्वे क्वीन परिसर, गंगाबावडी नंबर 1, लोटस इमारत, मालाड सब-वे, पाटकरवाडी, मंचुभाई रोड, पुष्पा पार्क, नडियादवाला चाळ, पारस अपार्टमेंट, लगून रोड
  • कांदिवली- दामुनगर, आकुर्ली रोड, समता नगर कांदिवली पूर्व, चारकोप मार्केट, भाबरेकरनगर, एकतानगर, गणेशनगर कांदिवली पश्चिम
  • घाटकोपर- 151 न्यू पंतनगर, पोलिस वसाहत, नारायणनगर, देवकाबाई चाळ, गौरीशंकरवाडी, हरीपाडा कादरी चाळ, विद्याविहार स्टेशन, घाटकोपर स्टेशन, लक्ष्मीनगर म्हाडा कॉलनी
  • भांडुप- मोरारजीनगर, पाइपलाइन सब-वे, चंदन रुग्णालय, टँक रोड, हरिश्चंद्र खोपकर मार्ग, पाटीलवाडी, भांडुप स्टेशन, उषानगर पोलिस चौकी, गांधीनगर, विक्रोळी रेल्वे स्टेशन परिसर, श्रीरामपाडा, उदयश्री सोयायटी
  • मुलुंड- एस. एल. रोड.-जव्हेर रोड जंक्शन, रणजित सोसायटी, शांती कॅम्पस, हिरानगर, भगवती सोसायटी, जमुना सोसायटी, केळकर कॉलेज, एलआयसी कॉलनी, शीतल दर्शन, साहनी कॉलनी नवघर रोड
  • वांद्रे पश्चिम- एस. व्ही. रोड रेल्वे कॉलनी, जयभारत सोसायटी, नॅशनल कॉलेज, अल्मेडा पार्क 6 वा आणि 10 वा रोड, रेक्लेमेशन, खार सब-वे
  • चेंबुर- सोमैया नाला, सुभाष नगर, शिवाजी नगर, देवनार नाला, मानखुर्द पीएमजी नाला, महाराष्ट्र नगर, बुद्ध नगर, रिफायनरी दक्षिण, विजयनगर, नवजीवन सोसायटी, इंदिरा नगर वाशीनाका, स्वस्तिक चेंबर, सुमननगर, पोस्टल कॉलनी रोड 15

mumbai to face massive water-logging this year read what BMC have to say

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com