
मुंबईकरांना गणेशोत्सव कालावधीत वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिका यांनी पुढाकार घेतला आहे.
गणेशोत्सव कालावधीत वाहतुकीचे अपडेट्स गुगल मॅप्सवर
मुंबई - मुंबईकरांना गणेशोत्सव कालावधीत वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिका यांनी पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सव कालावधीत ज्याठिकाणी विसर्जन मार्गांवर रस्ते बंद, पर्यायी मार्ग किंवा वाहतूक व्यवस्थेत बदल असणार आहेत, अशी माहिती आता मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. येत्या अनंत चतुदर्शीबाबतची ही माहिती मुंबईकरांना आपल्या गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे. मॅपवर नेव्हीगेशन व्यवस्थित पद्धतीने व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिका, गुगल मॅप्स आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे हा मार्ग दर्शवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबईत गौरी गणपतीचे ६ सप्टेंबरला विसर्जन आहे. तर अनंत चर्तुदशी ९ सप्टेंबरला आहे. मुंबई शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकुण ७६ ठिकाणी रस्ते बंद असणार आहेत. तर वन वे वाहतूक ही ५४ रस्त्यांवर असणार आहे. अवजड वाहनांसाठी 57 रस्त्यांवर बंदी असणार आहे. तर वाहने पार्किंगसाठी ११४ ठिकाणी विसर्जनासाठी होणारी गर्दी पाहता निर्बंध घालण्यात आले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या टीमच्या माध्यमातून आता गुगल मॅपवरच एखादा रस्ता बंद असण्याबाबतची माहिती पर्यायाच्या रूपात वॉट्स एपवरही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गुगलवर लाल तुटक लाईन्सच्या माध्यमातून बंद असलेला रस्ता अपडेट केला जाणार आहे. त्याचवेळी पर्यायी अशा मार्गाचीही सूचना युजर्सना करण्यात येत आहे.
गुगल मॅपवर चॅटबोटच्या माध्यमातूनही रस्ते बंदबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच चॅटबोटची सुविधा मुंबईकरांना देण्यात आली आहे. आता गुगल मॅपचे फीचरही चॅटबोटवर उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये पालिकेने रस्ते बंद असलेली माहिती पुरवली आहे. त्यामुळे चॅटबोट वापरकर्त्यांनाही ही माहिती अपडेटेड स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याआधी गुगल मॅपवर कोविड कंटेनमेंट झोनची माहिती अपडेट करून देण्यात आली होती. यंदा बंद रस्त्यांची माहिती ही गुगल आणि लेप्टनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.