ऑक्‍टोबरपासून स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

दादर -  मुंबई कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी २ ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या जी उत्तर विभागांतर्गत येणाऱ्या दादर, माटुंगा, माहीम व धारावीतील सोसायट्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

दादर -  मुंबई कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी २ ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या जी उत्तर विभागांतर्गत येणाऱ्या दादर, माटुंगा, माहीम व धारावीतील सोसायट्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या वतीने दादर, माटुंगा, माहीम व धारावीतील सोसायटी सदस्यांची गुरुवारी (ता. १४) बैठक घेतली. या बैठकीत सहायक आयुक्त रमाकांत बिरादार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे तानाजी घाग यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अनेक सोसायट्यांच्या सदस्यांनी पालिकेने बनवलेल्या नियमावलीला नागरिकांनी विरोध केला. 

माहीम, धारावी, माटुंगा व दादर विभागातील ४० सोसायट्यांमधून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत २००० स्क्वेअरपेक्षा मोठ्या सोसायटी आणि एक हजार किलोपेक्षा जास्त कचरा असणाऱ्या सोसायट्यांना वेस्ट मॅनेजमेंट सक्तीचे करण्यात येणार आहे. झोपडपट्टी आणि चाळीतील ओला व सुका कचरा विभाजित करून पालिकेकडून उचलण्यात येईल. यावर सोसायटीतील सदस्यांनी मुलांना परिसरात खेळायला व पार्किंगसाठी जागा नसताना वेस्ट मॅनेजमेंटसाठी जागा कशी उपलब्ध करायची, असा प्रश्‍न उपस्थित करत नियमावलीला विरोध केला. या वेळी प्रो इको मनेजमेंटचे संचालक अमोल कवे यांनी सेंद्रिय खत घरात, सोसायटीत कमी खर्चात कसे बनवता येईल, याचे प्रात्यक्षिक दाखवले. इतके दिवस मुंबईकरांचा कचरा पालिकेची जबाबदारी होती. या मोहिमेंतर्गत मुंबईतील नागरिकच ही जबाबदारी पूर्ण करणार आहेत. या मोहिमेंतर्गत २ ऑक्‍टोबरपासून ओला कचरा उचलला जाणार नाही. तसेच विघटन न होणारा कचरा पालिकेकडून १५ दिवसांतून एकदा उचलला जाईल, अशी माहिती या वेळी बिरादार यांनी दिली.

माझा कचरा, माझी जबाबदारी समजून नागरिकांनी पालिकेच्या या कचरामुक्त योजनेला प्रतिसाद द्यावा. हॉटेल, मार्केटसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
- तानाजी घाग, सहायक मुख्य व्यवस्थापक, घनकचरा व्यवस्थापन विभाग

Web Title: mumbai garbage dadar Cleanliness campaign