मुंबईत पावसाचा जोर ओसरणार; पण ठाणे, रायगड पालघरमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज

समीर सुर्वे
Sunday, 30 August 2020

सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत उद्या पावसाचा जोर ओसरणार असून 2 सप्टेंबरपर्यंत हलक्‍या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबई : सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत उद्या पावसाचा जोर ओसरणार असून 2 सप्टेंबरपर्यंत हलक्‍या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. तर, पालघर, ठाणे, रायगडमध्ये रविवारीही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. मुंबईत पावसाचा जोर ओसरणार असल्याने पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

शुक्रवारपासून मुंबईत पावसाने चांगला जोर पकडला आहे. शुक्रवारी पुर्व उपनगरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज पश्‍चिम उपनगरातही जोरदार पाऊस झाला. दहिसर येथे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 116 मिमी पावसाची नोंद झाली. तर, वांद्रे येथे 108 मिमी आणि राममंदिर रोड येथे 107.5 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. मुंबईतील अनेक भागात आज सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु होती. अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या. पुर्व उपनगरात सर्वाधिक चेंबूर येथे 59.6 आणि शहर विभागात कुलाबा येथे 52.8 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, उद्यापासून मुंबईतील पावसाचा जोर ओसरणार आहे. मुंबईत आज कुलाबा येथे संध्याकाळपर्यंत 26.8 कमाल आणि 24 अंश सेल्सिअस किमान तापामानाची नोंद झाली. तर, सांताक्रुझ येथे कमाल 26.7 आणि किमान 24.2 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली आहे. 
पालघरमध्ये सोमवारपर्यंत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तर, रायगड आणि ठाण्यात उद्या जोरदार पाऊस होणार असून त्यानंतर 2 सप्टेंबरपर्यंत हलक्‍या सरी कोसळण्यचा अंदाज आहे.रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्येही तोपर्यंत हलक्‍या सरी राहणार आहेत

मोठी बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी कुलगुरूंची समिती गठीत; उद्याच सादर करणार अहवाल

तापमानही वाढण्याची शक्यता
शनिवारी दिवसभर हवेत गारवा होता. मात्र, रविवारपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. रविवारी कमाल तापमान 28 अंशापर्यंत तर, किमान तापमान 30 अंशापर्यंत पोहचेल, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai to get heavy rains; The weather forecast will remain the same for the next three days