मुंबई-गोवा सागरी महामार्गासंदर्भात समोर आली 'ही' नवी अपडेट

पूजा विचारे
Sunday, 19 July 2020

कोकणातील मुंबई-गोवा सागरी महामार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी नव्याने एजन्सी नेमण्यात येणार आहे. खासदार सुनील तटकरे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

मुंबईः  कोकणला मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर आणि समुद्र किनारपट्टीच्या भागातून जाणारा हा सागरी महामार्ग कोकणच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाची चर्चा आहे. त्यातच आता एक नवीन अपडेट आली आहे. कोकणातील सागरी महामार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी नव्याने एजन्सी नेमण्यात येणार आहे. खासदार सुनील तटकरे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

अलिबाग-श्रीवर्धन-दाभोळ-गणपतीपुळे-रत्नागिरी- देवगड-मालवण-वेंगुर्ला अशा किनारी मार्गावरून हा रस्ता विकसित केला जाणार आहे. या मार्गाचा सुधारित आराखडा (डीपीआर) तयार केला जाणार असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

३५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा या मार्गाची घोषणा झाली त्या वेळी किनारपट्टीवरील गावे मुंबईशी जोडली जावीत आणि तेथे विकासगंगा पोहचावी हा मूळ हेतू त्यामागे होता. नंतरच्या काळात सागरी महामार्गाचे काम सुरू झाले. मात्र आधीच अस्तित्वात असलेले रस्ते विविध खाड्या, नद्यांवर पूल बांधून जोडावं इतकीच मर्यादित संकल्पना होती. आता हा महामार्ग साकारत असताना त्याचा मुंबईशी असलल्या कनेक्टिव्हिटीच्या उद्देशासोबतच या महामार्गाला पर्यटनाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी काम करावं लागणार आहे.

अधिक वाचाः  भयाण वास्तव!  मरण झाले स्वस्त, अंत्यविधी महागला; कार्याला येतोय तब्बल 'इतके' हजार रुपये खर्च
 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आरोंदा किरण पाणीपर्यंत 570 किलोमीटरच्या सागरी महामार्गाला अनेक वेळा चालना देण्याचा प्रयत्न झाला होता. या मार्गाचा नव्याने आराखडा तयार करताना किनारपट्टीवरील नागरिकांच्या पर्यटन, मासेमारी, कृषीमधून उत्पन्न वाढीचा विचार केला जाणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. 

हेही वाचाः विकेंन्ड स्पेशल आनंदाची बातमी  खास मुंबईकरांसाठी, जाणून घ्या 

राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४९ किलोमीटर सागरी महामार्गाचे काम पूर्ण झालं आहे. यात कुंभारमाठ येथील चारशे मीटरचे काम न्यायप्रविष्ठ बाबीमुळे अडकले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात २२७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून ११ किलोमीटरचे काम प्रलंबित आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai goa Coastal road project Outline sunil tatkare