गोखले उड्डाण पुलाचे १६ गर्डर हटविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gokhale Flyover

अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले उड्डाणपुलाचे १६ गर्डर काढण्याचे काम पश्चिम रेल्वेने विक्रमी वेळेत पूर्ण केले.

Mumbai News : गोखले उड्डाण पुलाचे १६ गर्डर हटविले

मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले उड्डाणपुलाचे १६ गर्डर काढण्याचे काम पश्चिम रेल्वेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. आता इतर काम पुर्ण झाल्यानंतर ३१ मार्चपर्यत मुंबई महापालिकेच्या ताब्यात पुल देण्यात येणार आहे. त्यानंतर पालिका पुलांची पुनर्बांधणीकरणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहेत.

अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले पुलाचे १६ स्टील गर्डर हटविण्यासाठी पश्चिम रेल्वेने ११ ते १२ मार्च रोजी रात्रकालीन विशेष ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकमध्ये पश्चिम रेल्वेने यशस्वीपणे १६ गर्डर हटविण्यात आले आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने अप धीमी, अप आणि डाउन जलद मार्गावर, प्लॅटफॉर्म क्रमांक ४ मार्गावर ४. ३० तासांचा ब्लॉक आणि पाचव्या मार्गावर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ९ मार्गावर ८ तासांचा ब्लॉक, तर अप आणि डाउन हार्बर मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला होता.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, शनिवारी- रविवारी मध्यरात्री ब्लॉक दरम्यान गोखले उड्डाणपुलाचे स्टीलचे १६ गर्डर काढण्यात आले. ७००,२४० आणि १० मेट्रिक टन क्रेनच्या मदतीने हे गर्डर काढण्यात आले. पाडकाम पुर्ण झाल्यानंतर ३१मार्चपर्यत महापालिकेच्या ताब्यात पुल देण्यात येणार आहे. त्यानंतर पालिका या पुलाची पुर्नबांधणी करेल.

गोखले पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. २०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले; मात्र, रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला . त्यानुसार जानेवारी पासून या पुलांचे पाडकाम रेल्वेने सुरु केले.