
Mumbai News : गोरेगावमधील फाळके चित्रनगरीतील विकासकामांसाठी १०० कोटींचा निधी
मुंबई - महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसराच्या पायाभूत सोयी- सुविधा आणि विकासकामांसाठी राज्य शासनाकडून १०० कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. निधी उपलब्ध करून दिल्याबाबत ढाकणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.
जगप्रसिद्ध असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरीत नियमित वाणिज्यिक तत्वावर चित्रीकरण सुरु असते. काळानुरूप चित्रीकरणाच्या बदलत्या गरजेनुसार चित्रीनगरीही बदलत असून चित्रीकरण करणाऱ्या संस्थाना दर्जेदार सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीतून चित्रनगरीतील स्टुडिओबाहेरील दुरुस्तींची कामे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चित्रनगरीतील हद्दीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संरक्षक भिंती बांधल्या जाणार आहेत. सोबतच, यापूर्वीच्या संरक्षक भिंतींची डागडुजी करण्यात येणार आहे.
चित्रनगरीच्या परिसरात नियमित २० हजाराहून अधिक लोकं आणि ७ हजारांहून अधिक वाहने विविध कामांसाठी ये- जा करत असतात. त्यामुळे अंतर्गत रस्ते विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. ही चित्रनगरी सर्वासाठीच आकर्षणाचा भाग असल्याने चित्रीकरणाच्या दृष्टीने तसेच पर्यटनाच्या दृष्टीने छोटी-छोटी चित्रीकरण स्थळे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत.