परळचं 'हाफकिन' वर्षभरात बनवणार Covaxin लसीचे 22.8 कोटी डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haffkine-Covaxin

'हाफकिन'ला केंद्राकडून 65 कोटी तर महाराष्ट्र सरकारकडून 94 कोटी रुपयांचे अनुदान

परळचं 'हाफकिन' वर्षभरात बनवणार Covaxin लसीचे 22.8 कोटी डोस

मुंबई: परळच्या हाफकिन बायोफार्मा (Haffkine Biopharma) कंपनीला कोव्हॅक्सीन (Covaxin) लस बनविण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली असून त्यासाठी अनुदानही दिले आहे. त्यानुसार 'हाफकिन'तर्फे वर्षभरात लसींचे 22.8 कोटी डोस बनविले जाणार आहेत. संपूर्ण लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारच्या मदतीने देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग सातत्याने वाढविण्यात येत आहे. त्यानुसार आता हाफकिन बायोफार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन (मुंबई), इंडियन इम्युनॉलॉजिकल्स (हैदराबाद), आणि भारत इम्युनॉलॉजिकल्स अँड बायोलॉजिकल्स (बुलंदशहर, उत्तरप्रदेश) या तीन सरकारी उद्योगांमध्ये लशी बनविल्या जातील. (Mumbai Haffkine Biopharma to produce 228 million Covaxin doses annually)

हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण करारानुसार परळ च्या हाफकिन मध्ये कोव्हॅक्सिन लशीचे उत्पादन होईल. एका वर्षात 22.8 कोव्हॅक्सिन लशींचे उत्पादन करण्याची आमची तयारी आहे. कोव्हॅक्सिन लशीच्या उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्मा कंपनीला केंद्र सरकारकडून 65 कोटी रुपयांचे तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून 94 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती हाफकिन बायोफार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड यांनी दिली.

covaxin

covaxin

या लस उत्पादनासाठी हाफकिनला आठ महिन्यांची मुदत देण्यात आली असून लस उत्पादनाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. लस उत्पादनाची प्रक्रिया दोन टप्प्यांची असते, महत्त्वाच्या औषधी भागाचे उत्पादन आणि अंतिम औषध उत्पादन. यातील दुसऱ्या टप्प्याची म्हणजे लशीसाठी अंतिम औषध उत्पादनाची यंत्रणा हाफकिनकडे यापूर्वीच आहे. पहिला टप्पा म्हणजे लशीसाठी महत्त्वाचा औषधी भाग तयार करण्यासाठी जैव सुरक्षा पातळीची यंत्रणा (बीएसएल 3) निर्माण करण्याची गरज आहे, असेही राठोड म्हणाले. BSL 3 ही सुरक्षा प्रमाण यंत्रणा असून ती प्रामुख्याने सूक्ष्म जंतूंचा वापर केल्या जाणाऱ्या कामाच्या ठिकाणी आवश्यक असते. अन्यथा श्वासाद्वारे सूक्ष्म जंतूचा शरीरात प्रवेश होऊन गंभीर आजार होऊ शकतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या यंत्रणेच्या उभारणीनंतर आपली लसनिर्मिती क्षमता दीर्घकाळासाठी मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे प्रतिपादन जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. रेणू स्वरूप यांनी सांगितले.

  • हा Video पाहिलात का...