मुंबई हायकोर्ट आलं राज्य राज्य सरकारच्या मदतीला धावून, केलं असं काही... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसंच माजी न्यायाधीश, कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेत काम करणारे कर्मचारी यांनी  मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत केली आहे

मुंबई: देश आणि संपूर्ण राज्य सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. मात्र संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे देशातले आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे देशाची आणि राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अनेक संस्था आणि कंपन्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत जमा करत आहेत. त्यात आता हायकोर्टही राज्यसरकारच्या मदतीला धावून आलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसंच माजी न्यायाधीश, कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेत काम करणारे कर्मचारी यांनी  मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. देशात बहुतांश सरकारी संस्थांकडून  PM केअर फंडमध्ये मदत निधी जमा करण्यात येत होता. मात्र हायकोर्टानं तसं न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे जमा केले आहे.

मोठी बातमी - तुमच्या आमच्या EMI बद्दल सर्वात मोठी बातमी! RBI देणार मोठा दिलासा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीश, कर्मचारी तसंच न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.

ठाणे जिल्हा सहकारी बँकेनंही लावला हातभार:

ठाणे जिल्हा सहकारी बँक लि. ने  ही  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसंच पुण्याच्या कोथरुडचे ६७ वर्षांचे रविंद्र धनंजय चौधरी यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५० हजार रुपये जमा केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौधरी यांचेही आभार मानले आहेत. "माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून ५० हजार रुपयांची मदत मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ खात्यात जमा करत आहे आणि यात खारीचा वाटा उचलत आहे”, असं रविंद्र चौधरी यांनी म्हंटलंय.

देवेंद्र फडणवीसांकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल झाली मोठी चूक...

आतापर्यंत जमा झालेत तब्बल ३१४ कोटी 

राज्यातल्या स्वंयसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी वर्ग,सामान्य नागरिक आणि लहान मुलं यांनी सगळ्यांनी मिळून केलेल्या मदतीमुळे आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल ३१४ कोटी रुपये जमा झाले आहेत.

तुम्हीही करू शकता मदत:

  • मुख्यमंत्री सहाय्यता निधी - कोविड-19 हे स्वतंत्र बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलं आहे.  
  • बचत खाते क्रमांक -- ३९२३९५९१७२०
  • शाखा -- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई ४०००२३
  • शाखा कोड -- ००३००
  • IFSC कोड -- SBIN००००३००

यावर तुम्ही तुमची मदत मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीत जमा करू शकता

mumbai high court helped state government by donating in CM relief fund


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai high court helped state government by donating in CM relief fund