अनधिकृत बांधकामांवर करडी नजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

कंत्राटदारांवर कठोर कारवाईचा मुंबई महापालिकेचा इशारा

मुंबई: अनधिकृत बांधकामे करून लाखो रुपये कमावणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. झोपड्या आणि काही इमारतींमध्ये बेकायदा बांधकामे केली जात असल्याचे उघड झाल्यानंतर महापालिकेने संबंधित कंत्राटदारांची नाकेबंदी करण्याचे ठरवले. डोंगरी येथील केसरभाई इमारत अतिक्रमणांमुळे कोसळल्याचे उघडकीस आल्यानंतर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

केसरभाई इमारत दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे. डोंगरी, चंदनवाडी, ग्रॅंट रोड या भागात बेकायदा बांधकामे करणाऱ्यांच्या टोळ्याच असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे ठरवले आहे. इमारतींसह आता झोपडपट्ट्यांतील अनधिकृत बांधकामेही महापालिकेच्या रडारवर आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या बहुमजली झोपड्यांकडेही पालिकेने मोर्चा वळवला आहे. 

दोन दिवसांपूर्वी धारावी झोपडपट्टीत बेकायदा बांधकाम करून मजल्यांवर मजले चढवणाऱ्या कंत्राटदारांना महापालिकेने चांगलाच हिसका दाखवला. झोपडीदादांच्या मदतीने अनधिकृत बांधकामे करणाऱ्या पाच कंत्राटदारांवर महापालिकेने ‘एमआरटीपी’ कायद्यांतर्गत कारवाई केली. अशा कंत्राटदारांना तडीपार केले जाण्याबरोबर तीन वर्षे कैदेची शिक्षा होऊ शकते. महापालिकेच्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. 

झोपडपट्ट्यात अशा कंत्राटदारांचे जाळे असताना काही भागांतील इमारतींमध्येही  दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बांधकाम केले जात आहे. डोंगरी भागात अनेक इमारतींमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai illegal construction on radar