प्रायोगिक लोकलमधील आसनव्यवस्था पूर्ववत होणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

त्या लोकलच्या एका प्रथम श्रेणीच्या प्रवाशाने मध्य रेल्वेच्या डीआरएम व रेल्वे मंत्रालयाला व्हिडीओ पाठवित बसायला जागा नाही, असे ट्विट केले. त्यावर मंत्रालयाने ट्विटने उत्तर देताना, या लोकलमधील आसनव्यवस्था पूर्ववत करण्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले.

मुंबई : गर्दीच्या रेट्यामुळे डोंबिवलीच्या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर काही लोकलमध्ये आसनव्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर बदलण्यात आली होती; मात्र लांबपल्ल्याच्या प्रवाशांनी त्यावर नापसंती दर्शविल्याने त्या लोकलमधील आसनव्यवस्था पूर्ववत करण्यात येणार आहे. 

डिसेंबर 2015 मध्ये डोंबिवली स्थानकातून निघालेल्या जलद लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. गर्दीच्या रेट्यामुळे तो लोकलच्या बाहेर फेकला गेला होता. या घटनेची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेत समिती स्थापन केली. समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार, प्रायोगिक तत्त्वावर लोकलच्या रेकमध्ये बदल करण्यात आला. त्यात, दरवाज्याजवळ तीन जण बसण्याचे आसन काढण्यात आले, तर इतर आसने दोन जण बसतील तेवढीच करण्यात आली. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये आठवडाभर हे काम करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात लांबपल्ल्याच्या मार्गावर ही लोकल चालविण्यात आली.

एक ते दीड तासाचा प्रवास उभा राहून कसा करायचा, हे मत प्रवाशांनी नोंदविले. प्रवाशांच्या प्रतिक्रियेनंतरच हा प्रयोग इतर लोकलमध्ये करण्याचा निर्णय घेतला जाणार होता; पण नकारात्मक प्रतिसादाने मध्य रेल्वेने हा प्रयोग थांबवला. आसन व्यवस्थेत बदल केलेल्या लोकल कुर्ला व ठाणे स्थानकादरम्यान चालवणे मध्य रेल्वे प्रशासनाला भाग पडले. दरम्यान, त्या लोकलच्या एका प्रथम श्रेणीच्या प्रवाशाने मध्य रेल्वेच्या डीआरएम व रेल्वे मंत्रालयाला व्हिडीओ पाठवित बसायला जागा नाही, असे ट्विट केले. त्यावर मंत्रालयाने ट्विटने उत्तर देताना, या लोकलमधील आसनव्यवस्था पूर्ववत करण्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले.

Web Title: Mumbai Local to get old seat arrangements