
Mumbai Latest News: दादर रेल्वे स्थानकात एका माथेफिरूने १९ वर्षीय तरुणीचे केस कापले आणि ते बॅगेत भरून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडला. माटुंग्यातील रुपारेल महाविद्यालयात जाणारी ही तरुणी या विचित्र प्रकाराने प्रचंड घाबरली आहे. दरम्यान, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत असून, तो हाती लागल्यानंतरच त्याचा हेतू स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माटुंगा रोड येथील महाविद्यालयात जाण्यासाठी पीडित तरुणीने सोमवारी सकाळी ८.०९ वाजता कल्याण स्थानकातून महिला विशेष लोकल पकडली. दादर स्थानकात ती सकाळी ९.२९ वाजता उतरली. पश्चिम दादर स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या ब्रिजवरून जात असताना बुकिंग खिडकीच्या समोर सकाळी ९.३०च्या सुमारास तिला अचानक काहीतरी टोचल्यासारखे वाटले.