
मुंबईच्या 'लॉकडाउन'संबंधी पालकमंत्र्यांचे सूचक विधान
सध्या मुंबईत चार वाजेपर्यंतच दुकाने खुली; मॉल्स-मल्टीप्लेक्स बंद
मुंबई: सरकारला लॉकडाऊन नकोय. पण नाईलाजाने काही निर्णय घ्यावे लागतात. आपण सुरूवातीला काही प्रमाणात शिथिलता दिली होती. नंतर निर्बंध लादले. आता पुन्हा एकदा मुंबईतील काही बाबतीत शिथिलता आणण्याबाबत सरकार आणि टास्क फोर्स विचार करत आहे. दुकानांच्या वेळा वाढवणे, प्रवाशांच्या बद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेणे या गोष्टी टास्क फोर्सच्या विचाराधीन आहेत. त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल अशी महत्त्वपूर्ण माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली. त्यांनी एका वृत्तवाहिनी संपर्क साधून ही अपडेट दिली. (Mumbai Lockdown Important Update by Guardian Minister Aslam Shaikh)
सोमवार पासून निर्बंध शिथिल होणार?
"निर्बंध शिथिल करण्याबद्दल कोणताही अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत बोलणं योग्य नाही. पण आपण सध्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याबाबत जी चर्चा सुरू आहे, त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. ट्रेनमध्ये प्रवासाला परवानगी कशाप्रकारे देता येईल? दुकाने दुपारपर्यंतच सुरू असतात, त्यात काय बदल करता येईल? मॉल्स, कपड्याची दुकाने, वाहतूक, दळणवळण यासंबंधी काय बदल करता येतील? याबाबत आम्ही येत्या आठवड्यात निर्णय घेऊ", असं असलम शेख यांनी स्पष्ट केलं.
नक्की काय बदल असू शकतील?
"लॉकडाउनमुळे अनेक गोष्टी बंद आहेत. लॉकडाउनमधील बदल ही एक साखळी आहे. त्यामुळे बदल करायचे असतील तेव्हा सर्व प्रकारचे बदल हळूहळू केले जातील. निर्बंध शिथिल करताना तिसऱ्या लाटेचाही विचार करणं गरजेचं आहे. लोकलमधील प्रवासाबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचं आहे. ट्रेनमधील प्रवाशांना लागण झाल्यास कोरोनाचा प्रसार अधिक वाढेल. त्यामुळे त्याबाबत योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे", असा पुनरूच्चार केला.