महापालिकेतील भ्रष्टाचाराची 'सीबीआय' चौकशी करा - विखे पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 डिसेंबर 2017

मुंबई - 'कमला मिल कंपाउंडमधील हॉटेलला आग लागून झालेला 14 जणांचा मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत. मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून, आणखी किती मुंबईकरांना आपले प्राण देऊन या अव्यवस्थेची किंमत मोजावी लागेल,'' अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी केली. थातूरमातूर चौकशी करण्यापेक्षा महापालिकेतील "सीबीआय'मार्फत चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

पोलिसांनी संबंधित हॉटेलमालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, या घटनेसाठी हॉटेलमालकांसोबतच महापालिकेचे वॉर्ड अधिकारी, नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत सारेच दोषी आहेत. या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झाले होते.

बांधकामामध्ये आगीला पोषक असे साहित्य मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले होते, आग लागल्यास ती विझविण्याची सक्षम यंत्रणा तर सोडाच; पण बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्गदेखील या ठिकाणी उपलब्ध नव्हता. या साऱ्या त्रुटींसाठी केवळ हॉटेलमालकच नव्हे तर मुंबई महापालिकाही जबाबदार आहे. येथील अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून 14 जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याबद्दल मनपा अधिकाऱ्यांवरसुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.

वर्षभरातील दुर्घटनांची "सीबीआय' चौकशी करा
या अग्नितांडवाची मुंबई महापालिका आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या निर्णयावरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, की मुळातच या घटनेसाठी सर्वप्रथम मुंबई महानगर पालिकाच जबाबदार आहे आणि त्याच महापालिकेच्या आयुक्तांकडून चौकशी करणे म्हणजे निव्वळ मलमपट्टी ठरेल. या घटनेची आयुक्तांमार्फत होणारी चौकशी आम्हाला मान्य नसून, मागील वर्षांत मुंबईत इमारत कोसळून व आगी लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या सर्वच घटनांची "सीबीआय'मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

Web Title: mumbai maharashtra news CBI inquiry into corruption in municipal corporation