फाईलवर मुख्यमंत्र्यांनी केली सही, त्यानंतर शेराच बदलला; मंत्रालयात घडला धक्कादायक प्रकार

पूजा विचारे
Sunday, 24 January 2021

मंत्रालयात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फाईलवरील शेरा बदल्याचं समोर आलं आहे.

मुंबईः  मंत्रालयात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फाईलवरील शेरा बदल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या मंत्रालयातील एका महत्त्वाच्या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. 

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं आपल्या वृत्तात म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी शेरा देऊन सही केली होती. मात्र सही केल्यानंतर या फाईलवर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सही केली होती. त्यावरील रिकाम्या भागात लाल रंगाच्या पेनानं नवीन शेरा लिहण्यात आला होता. त्या मोकळ्या भागात लिहिण्यात आलं होतं की, चौकशीनंतर ही फाईल बंद करावी. 

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती डीसीपी झोन 1 चे शशीकुमार मीणा यांनी दिली आहे. तर हा प्रकार उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली.

नेमकी कसली होती ती फाईल?

फडणवीस सरकारच्या काळात जेजे स्कूल ऑफ आर्ट इमारतीच्या बांधकामामध्ये आर्थिक अनियमितता समोर आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात काढले होते.  वरिष्ठ अभियंता असलेले नाना पवार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते.  नाना पवार हे त्यावेळी कार्यकारी अभियंता होते.

महाविकासआघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आणि याबद्दलची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. मुख्यमंत्र्यांनी त्या फाईलवर सही केली. त्यानंतर  मुख्यमंत्र्यांकडून सही होऊन या फाईल्स सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परत आल्या. ज्यावेळी त्या फाईल पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आल्या त्यावेळी फाईलवरील शेरा पाहून अशोक चव्हाण यांना धक्का बसला. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या प्रस्तावात बदल करण्यात आला होता.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामधून नाना पवार यांचे नाव वगळण्यात आले होते. अशोक चव्हाण यांना फाईलवरील शेऱ्याबद्दल संशय आला. एकीकडे सर्व अभियंत्याविरोधात चौकशी कायम ठेवली होती आणि केवळ नाना पवार यांच्याविरोधातली चौकशी बंद करण्याचे आदेश दिले होते. 

फाईलवर ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सही केली होती, त्यावरील भागात लाल रंगाच्या पेनाने छोट्या अक्षरांमध्ये शेरा लिहिलेला होता. संशय आल्यानं अशोक चव्हाण यांनी पुन्हा चौकशीसाठी ती फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईल्सच्या स्कॅन करून ठेवल्या जातात. स्कॅन केलेल्या कॉपी तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा लिहला नसल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांकडून नाना पवार यांच्या चौकशीसाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. 

हेही वाचा- Corona Vaccination: सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस होणार लसीकरण

या प्रकरणी आता मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mumbai mantralaya news cm uddhav thackeray signed file tampared nana pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai mantralaya news cm uddhav thackeray signed file tampared nana pawar