esakal | मध्य रेल्वे, एनडीआरएफने केले मॉकड्रिल | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

mockdrill

Mumbai : मध्य रेल्वे, एनडीआरएफने केले मॉकड्रिल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आपत्तीजनक घटनेतून प्रवाशांचा बचाव करणे, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रात्यक्षिके मध्य रेल्वे आणि एनडीआरएफच्या वतीने केली जातात. मागील वेळी लोकल पुराच्या पाण्यात अडकल्यास कशाप्रकारे कृती करायची याची मॉकड्रिल घेण्यात आली. तर, शुक्रवारी, (ता. 8) रेल्वे डब्याला आग लागली तर कोणती पावले उचलायची याची मॉकड्रिल करण्यात आली असून यशस्वी ठरली.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोठा अपघात झाल्यास विविध विभागांची सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ) संयुक्त कवायती आयोजित केली जाते. शुक्रवारी, (ता.8) रोजी कल्याण यार्ड येथे कवायती करण्यात आल्या. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांच्या कृत्रिम अपघाताची परिस्थिती तयार करण्यात आली. एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला संदेश देण्यात आला. एनडीआरएफ घटनास्थळी सकाळी 10.45 वाजता पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले.

हेही वाचा: Mumbai : महिलांसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद

डबा छतावरून आणि खिडक्यांमधून कापला आणि नंतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ जवान डब्यात घुसले. आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्रांचा वापर केला. रेल्वे रुग्णवाहिका सकाळी 10.58 वाजता घटनास्थळी पोहोचली आणि अग्निशमन दल सकाळी 11.05 वाजता आले. रेल्वे संरक्षण दलानेही ड्रिलमध्ये भाग घेतला आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात शिरून आग पूर्णपणे विझवली.

सर्व प्रवाशांना सकाळी 11.30 वाजता बाहेर काढण्यात आले आणि जखमींवर प्रथमोपचार करण्यात आला. घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याचे निकष तपासले. सर्व विभागाने त्वरित प्रतिसाद दिला आणि जलद असल्याचे दाखवून दिले. आपत्कालीन परिस्थिती संपूर्ण तासाभरात नियंत्रणात आणली. या कवायतींमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सींसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत होते आणि वास्तविक जीवनात मोठ्या प्रमाणात मदत होते, असे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

मुंबई विभागाचे उद्दिष्ट शून्य अपघाताचे आहे. तथापि, अशी कोणतीही अनुचित घटना घडल्यास, सज्जता आणि जलद प्रतिसादासाठी या कवायती रेल्वेद्वारे संयुक्तपणे सुरू ठेवल्या जातील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.या कवायतीचे समन्वय मुंबई विभागाच्या संरक्षा विभागाने केले. कल्याण रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक शशांक मेहरोत्रा, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी रॉबिन कालिया, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के.सिंह उपस्थित होते.

loading image
go to top