संसदेत प्रश्न विचारण्यात मुंबईकर खासदारांची आघाडी, कीर्तीकरांचे वर्षात 195 प्रश्न

संसदेत प्रश्न विचारण्यात मुंबईकर खासदारांची आघाडी, कीर्तीकरांचे वर्षात 195 प्रश्न

मुंबईः  मुंबईतील सर्व म्हणजे सहा खासदारांनी गेल्या वर्षभरात लोकसभेत प्रश्न विचारण्यात आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा या सर्वांनी कितीतरी अधिक प्रमाणात प्रश्न विचारले आहेत. वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सर्वात जास्त म्हणजे 195 प्रश्न उपस्थित केले आहेत. 

मुंबई व्होट या स्वयंसेवी संस्थेने खासदारांच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. मे महिन्यात लोकसभा निवडणुका झाल्यावर जूनमध्ये पहिले अधिवेशन झाल्यापासून मार्चपर्यंत तीन अधिवेशने झाली. या कालावधीचा हा आढावा घेण्यात आला आहे. या खासदारांनी खर्च केलेला खासदार निधी, लोकसभेत विचारलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, संसदेतील उपस्थिती, दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न, या सर्व मुद्यांचा उल्लेख या अहवालात आहे. 

केंद्र सरकारच्या मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड योजनेनुसार खासदारांना दरवर्षी आपल्या मतदारसंघात पाच कोटी रुपयांपर्यंतची कामे सुचविण्याचा अधिकार असतो. मुंबईकर खासदारांनी यापैकी 70 टक्के निधी स्वच्छतागृहांची बांधणी, सांडपाणी आणि मलनिःसारण व्यवस्था तसेच रस्तेबांधणी यावर खर्च केला आहे. हा निधी खर्च करण्यात पूनम महाजन (4.86 कोटी रु.), राहूल शेवाळे (4.90 कोटी), अरविंद सावंत (4.37 कोटी) आणि मनोज कोटक (4.89 कोटी) हे आघाडीवर आहेत. तर गजानन कीर्तीकर (2.31 कोटी) आणि गोपाळ शेट्टी (2.57 कोटी) हे याबाबतीत पिछाडीवर आहेत. 

संसदेत एखाद्या समस्येवर प्रश्न उपस्थित केला की संबंधित विभागामार्फत प्रशासनाच्या तळाच्या स्तरापर्यंत माहिती मागवली जाते. त्यामुळे संबंधित यंत्रणा हलू लागते आणि त्या कामाचीही प्रगती होते किंवा ती समस्या सोडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होते. त्यामुळे संसदेत विचारलेले प्रश्न या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात.

वर्षभरात कीर्तीकर यांनी 195 तर शेवाळे यांनी 108 प्रश्न विचारले. सावंत हे पहिले काही महिने मंत्री असल्याने त्यांना त्या काळात प्रश्न विचारण्याचा हक्क नव्हता. उरलेल्या अधिवेशनात त्यांनी 26 प्रश्न विचारले. पूनम महाजन (87 प्रश्न), कोटक (83) आणि शेट्टी (95) अशी इतरांची कामगिरी होती. प्रश्न विचारण्याबाबत देशातील खासदारांची एकूण सरासरी 49 आहे. त्यामुळे मुंबईकर खासदारांची कामगिरी त्यातुलनेत किमान दुप्पट तरी आहेच. 

तीन संसद अधिवेशनांमध्ये कीर्तीकर यांनी 79 टक्के हजेरी लावली तरीही त्यांनी सर्वात जास्त प्रश्न विचारले. तर कोटक आणि शेट्टी हे रोजच हजर होते. महाजन (88 टक्के), शेवाळे (91 टक्के) आणि सावंत (98 टक्के) यांची हजेरीही चांगली होती. संसदेत शेवाळे यांनी 49 चर्चांमध्ये तर शेट्टी यांनी 35 आणि सावंत यांनी 25 चर्चांमध्ये भाग घेतला. कीर्तीकर यांचा 14 चर्चांमध्ये, कोटक यांचा 17 चर्चांमध्ये आणि श्रीमती महाजन यांचा 5 चर्चांमध्ये सहभाग होता.

खासदारांची नावे

उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी (भाजप)
वायव्य मुंबई - गजानन कीर्तीकर (शिवसेना)
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन (भाजप)
इशान्य मुंबई - मनोज कोटक (भाजप)
दक्षिण मध्य मुंबई - राहूल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना) 

विचारलेल्या प्रश्नांचे मुख्य विषय 

  • कीर्तीकर - अर्थ 15, आरोग्य व कुटुंबकल्याण 12, वन, पर्यावरण व हवामान बदल 11, कृषी व शेतकरी कल्याण 11, रस्ते, परिवहन व महामार्ग 10
  • श्रीमती महाजन - गृहनिर्माण व नागरी व्यवहार 6, रेल्वे 5, महिला व बालकल्याण 4, वन, पर्यावरण व हवामान बदल 4, सांस्कृतिक 4
  • शेवाळे - अर्थ 14, आरोग्य व कुटुंब कल्याण 12, मनुष्यबळ विकास 6, नागरी विमानवाहतूक 6, दूरसंचार 5
  • सावंत -  आरोग्य व कुटुंब कल्याण 3, अर्थ 3, वन, पर्यावरण व हवामान बदल 2, जलशक्ती 2, मनुष्यबळ विकास 2
  • कोटक - वन, पर्यावरण व हवामान बदल 8, रस्ते, परिवहन व महामार्ग 5, गृहनिर्माण व नागरी व्यवहार 5, आरोग्य व कुटुंब कल्याण 5, अर्थ 5
  • शेट्टी - वन, पर्यावरण व हवामान बदल 11, अर्थ 8, मनुष्यबळ विकास 7, गृह 7, परराष्ट्र 6

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai MPs lead asking questions Parliament gajanan Kirtikar 195 questions year

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com