esakal | दिलासादायक! आता खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता नाही पडणार

बोलून बातमी शोधा

oxygen cylender 1.jpg
दिलासादायक! आता खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता नाही पडणार
sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगात थैमान घातलं आहे. या विषाणूने भारतातही शिरकाव केला असून आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच मुंबईमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. परिणामी, अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर व बेडची कमतरता जाणवू लागली आहे. मात्र, आता कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महानगर पालिकेने तशी तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे वेळ पडल्यास खासगी रुग्णालयांमध्येही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

पुढील काही दिवस मुंबईला रोज 500 टन ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. हा ऑक्‍सिजनचा साठा वेळ पडल्यास खासगी रुग्णालयातही वापरण्याची तयारी महानगर पालिकेने दर्शविली आहे. मुंबईला रोज 235 मेट्रीक टन वैद्यकीय ऑक्‍सिजनची गरज असते. त्यामुळे महानगर पालिका दररोज अतिरिक्त 50 मेट्रीक टन ऑक्‍सिजन विकत घेणार आहे. त्याच बरोबर विशाखापट्टणम,जामगर आणि रायगड जिल्ह्यातून पुढील काही दिवस महानगर पालिका 500 मेट्रीक टन ऑक्‍सिजन विकत घेणार आहे.

महापालिकेच्या रुग्णालयातील गरजेपेक्षा तब्बल दुप्पट ऑक्‍सिजन पुढील काही दिवस मुंबईला मिळणार आहे. यात केवळ पालिकेच्या रुग्णालयांसाठीच हा ऑक्‍सिजन वापरला जाणार नसून गरज पडल्यास खासगी रुग्णालयांसाठी याचा वापर करता येणार आहे. खासगी रुग्णालयांना लागणार ऑक्‍सिजन मुंबई महानगर पालिकेच्या कोट्यात समाविष्ठ करण्यता आला आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा: कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर ८ आठवड्यांचं का?

20 टक्के ऑक्‍सिजन राखून ठेवणार

मुंबईला मिळणाऱ्या ऑक्‍सिजनपैकी 20 टक्के ऑक्‍सिजन आपात्कालीन स्थितीसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. त्यात,रोजचा 50 मेट्रीक टन ऑक्‍सिजन मिळणार आहे. त्याचा प्रामुख्याने वापर गरज वाढल्यास करता येणार आहे.असेही सांगण्यात आलं आहे.

ऑक्‍सिजन कॉन्सनट्रेटर बसवणार

मुंबई महानगर पालिका जंम्बो कोविड केंद्र तसेच काही रुग्णालयात ऑक्‍सिजन कॉन्सनट्रेटर तसेच ऑक्‍सिजन प्रोसेसर बसवणार आहेत, असेही काकाणी यांनी सांगितले.ऑक्‍सिजन कॉन्सनट्रेटरमध्ये पाण्यातून ऑक्‍सिजन तयार केला जातो. याच्या छोट्या छोट्या मशिनही असतात.तसेच ऑक्‍सिजन प्रोसेसरच्याही छोट्या छोट्या मशिन असतात.

संपादन : शर्वरी जोशी