जी-२० परिषदेसाठी मुंबई पालिकेची तयारी; महत्वाच्या इमारतींवर विद्युत रोषणाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

G-20 conference

आगामी जी-२० परिषदेच्या निमित्ताने १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर मुंबईत मोठ्या प्रमाणात परदेशी महत्वाच्या व्यक्ती हजर राहणे अपेक्षित आहेत. जी २० परिषदेच्या तयारीसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.

G-20 Conference : जी-२० परिषदेसाठी मुंबई पालिकेची तयारी; महत्वाच्या इमारतींवर विद्युत रोषणाई

मुंबई - आगामी जी-२० परिषदेच्या निमित्ताने १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर मुंबईत मोठ्या प्रमाणात परदेशी महत्वाच्या व्यक्ती हजर राहणे अपेक्षित आहेत. जी २० परिषदेच्या तयारीसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणी रंगरंगोटी करतानाच महत्वाच्या अशा व्हीआयपी रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत याचीही काळजी पालिकेकडून घेण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यात पार पडलेल्या बैठकीनुसार तयारीचा आढावा घेण्यात आला. मुंबईत सध्या अनेक ठिकाणी सुशोभिकरणाची कामे सुरू असून येत्या १० डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे उदिष्ट आहे. पालिकेकडून अनेक ठिकाणी सुशोभिकरणाची कामे ही आधीच पूर्ण करण्यात आली आहेत.

या काळात महत्वाच्या इमारतींवर मोठ्या प्रमाणात रोषणाईही करण्यात येणार आहे. त्यामध्ये महत्वाच्या इमारतींमध्ये गेट वे ऑफ इंडिया, एशियाटीक लायब्ररी, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया याठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येणरा आहे. त्यासोबतच पालिकेकडून मोठ्या प्रमाणात साफसफाईची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या भागात साफसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी संलग्न अशा रस्त्यांच्या जागी खड्डे भरणे, फुटपाथ, डिव्हाडरचे दगड आणि दिशादर्शक फलक रंगवण्याचे कामही पालिकेकडून करण्यात आले. काही ठिकाणी रस्त्यांचे सरफेसिंग करण्याचे काम पालिकेकडून करण्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती.

मुंबई महानगरपालिकेकडून एअरपोर्ट ते हॉटेल अशा अंतराच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यासोबतच जी २० परिषदेच्या जिओ वर्ल्ड सेंटर आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन आणि रस्ते विभाग दिवसरात्र काम करत आहे. या परिषदेला उपस्थित राहणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि सहभागी व्यक्ती यांची व्यवस्था केंद्राकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रॅंड हयात (सांताक्रुझ), ताज महाल पॅलेस (कुलाबा), ट्रायटंड (नरिमन पॉईंट) आणि ताज लॅण्ड्स एण्ड (वांद्रे) यासारख्या हॉटेलमध्ये पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.