मुंबईत 'दिग्गजांना' दाखविली मतदारांनी 'औकात'

कुणाल जाधव - सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

अनेकांना पराभवाचा झटका

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक मात्तबरांना मतदारांनी "औकात' दाखविली आहे. माजी आमदार मंगेश सांगळे, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, माजी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार, खासदार राहुळ शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे अशा अनेक दिग्गजांना पराभवाची "चव चाखावी' लागली आहे.

अनेकांना पराभवाचा झटका

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक मात्तबरांना मतदारांनी "औकात' दाखविली आहे. माजी आमदार मंगेश सांगळे, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, माजी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार, खासदार राहुळ शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे अशा अनेक दिग्गजांना पराभवाची "चव चाखावी' लागली आहे.

शिवसेना आणि भाजप युती तोडण्यात भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत आशिष शेलारांना पराभूत करण्याचा "विडा' शिवसैनिकांनी उचलला होता. मात्र यात त्यांना यश आले नाही. आशिष शेलार वांद्रयातून आमदार म्हणून निवडून आले. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शेलारांचा हिशेब चुकता करण्याची आयतीच संधी विनोद शेलरांच्या रुपात शिवसैनिकांना चालून आली. या संधीचा पुरेपुर फायदा घेत शिवसैनिकांनी घेतला. प्रभाग क्रमांक 51 मधून भाजपच्या तिकीटावर लढणारे शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्या पराभवाचे हेच कारण आहे. एकूण 13 उमेदवार असलेल्या या प्रभागातून शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर हे विजयी झाले आहेत. पालिकेचे शिक्षण समितीचे अध्यक्षपद उपभोगलेल्या विनोद शेलार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला "सोडचिठ्‌ठी' देत "भाजपवासी' झालेल्या मंगेश सांगळे यांनाही मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. 2017 च्या निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर सांगळे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत विक्रोळी परिसरातून आमदार म्हणून सांगळे थेट विधानसभेत दाखल झाले. चांगल्या कामामुळे "आदर्श आमदार' म्हणून त्यांचा गौरवही करण्यात आला. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी पडल्यावर सांगळेंनी मनसेला "रामराम' करत भाजपच्या तंबूत "एन्ट्री' केली. भाजपनेही त्यांचे स्वगत करत त्यांना विक्रोळीच्या 118 क्रमांकाच्या प्रभागातून पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. सत्तेसाठी पक्ष सोडलेल्या सांगळेंना मात्र याही वेळेस पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 15 उमेदवार रिंगणात असलेल्या या प्रभागात शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होती. या लढतीत शिवसेनेचे उपेंद्र सावंत यांनी बाजी मारली. कट्टर शिवसैनिक म्हणून नावाजलेले नगरसेवक नाना आंबोले यांनी ऐन निवडणुकीत भाजपत प्रवेश केला.आंबोले यांच्या पत्नी तेजस्विनी आंबोले यांना 203 क्रमांकाच्या प्रभागातून भाजपने उमेदवारी देऊ केली. मात्र, पक्षांतर करुनही तेजस्विनी आंबोले यांना विजय मिळविता आला नाही. इथून शिवसेनेच्या सिंधु मसुरकर विजयी झाल्या.

प्रचारादरम्यान भाजपच्या आरोपांना चोख उत्तर देण्यासाठी शिवसेनेने खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली होती. पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या शेवाळेंनी भाजपवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, दुर्दैवाने आपल्या पत्नी कामिनी शेवाळे यांना निवडून आणण्यात शेवाळे अपयशी ठरले. मानखुर्दच्या 144 क्रमांकाच्या प्रभागातून लढणाऱ्या कामिनी शेवाळे यांना भाजपच्या अनिता पांचाळ यांनी पराभूत केले आहे. खासदार राहुल शेवाले यांच्यासाठी हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल.

उच्चपदस्थ सरकारी नोकरी सोडून सौ. स्वप्ना संदीप देशपांडे या प्रभाग क्रमांक 191 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मनसेचे माजी गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी असलेल्या स्वप्ना देशपांडे यांची दादर प्रभागातील लढत मनसेने प्रतिष्ठेची केली होती. गेल्या निवडणुकांमध्ये मनसेने दादर प्रभागात वर्चस्व राखले होते. मात्र यंदा मनसेला इतिहासाची "पुनरावृत्ती' करता आली नाही. शिवसेनेच्या माजी महापौर विशाखा राऊत यांनी देशपांडे यांना पराभवाची धूळ चारली. कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांना 132 क्रमांकाच्या प्रभागातून मुंबईतील सर्वांत श्रीमंत उमेदवार पराग शहा यांनी आव्हान दिले होते. निवडणुकांचा दांडगा अनुभव पाठीशी असलेले छेडा या प्रभागातून पराभूत झाले. भाजपच्या पराग शहा यांनी इथे "जाएंट किलर'ची भुमिका बजावली. शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांना प्रभाग क्रमांक 60 मधून पराभवाला सामोरे जावे लागले. तर प्रभाग क्रमांक 9 मधून माजी उपमहापौर मोहन मिठबावकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांनाही प्रभाग क्रमांक 11 मधून पराभव स्विकारावा लागला.

Web Title: mumbai municipal election result