
Mumbai News : मुंबई मनपा गोळीबार प्रकरण: 4 शूटर अटकेत...दोघांचा शोध सुरू
मुंबई : 9 जानेवारी रोजी मुंबई महापालिकेतील कंत्राटदारावर झालेल्या गोळीबारा प्रकरणी 4 आरोपींना कुर्ला , धारावी आणि व्ही बी नगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गुरूवारी रात्री भिवंडीतून अटक केली आहे.
सागर येरुणकर, करण थोरात, अभिषेक सावंत, विनोद कांबळे अशी अटक आरोपीची नावे असून ते घाटकोपर भागातील रहिवासी आहेत. या प्रकरणात अजून दोन आरोपी समीर सावंत व गणेश चुक्कल यांचा शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात या दोघांची महत्वाची भूमिका आहे.
अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घाटकोपर, भोईवाडा पोलीस ठाण्यातर्गत गंभीर गुन्हे दाखल आहे. या चारही आरोपींना न्यायालयाने 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात महापालिकेतील कांत्रटावरून काही आर्थिक व्यवहारमुळे गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसाना संशय आहे.
मुंबईतील कुर्ला भागातील कापडिया नगर परिसरात सोमवारी 9 जानेवारी रोजी रात्री सुरज प्रताप सिंह देवरा नामे मुंबई महापालिका कंत्राटदारावर गोळीबार करण्यात आला होता. कामावरुन घरी परतत असताना दोन अज्ञात मारेकऱ्यांनी सूरज सिंह यांच्यावर गोळीबार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. दहिसर येथे वास्तव्यास असलेला कंत्राटदार सुरज प्रताप सिंह देवरा यांच्यावर सोमवारी 9 जानेवारीला रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. मात्र, सुदैवाने सुरज सिंह यांना गोळी लागली नाही. सुरज यांच्या दिशेने झाडलेली गोळी त्यांच्या मोटरगाडीला लागली. त्यानंतर सुरज सिंह तेथून आपल्या मोटरगाडीमधून निघून गेले.
या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी भादंवि कलम 307, 34 आणि शस्त्रास्त्र बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपींना पकडण्यासाठी 3 पोलिस पथकाची स्थपना करून पोलिसांनी तपास सुरू केला . पोलीस आरोपींच्या मागावर होते. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भिवंडी येथील मुंबई नाशिक हायवेवरील एका ठिकाणी लपले आहे.
पोलीसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचत चारही आरोपींना गुरूवारी रात्री जेरबंद केले.सध्या ते पोलीस कोठडीत असून इतर 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.प्राथमिक तपासात महापालिकेतील कांत्रटावरून काही आर्थिक व्यवहारमुळे गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसाना संशय आहे.