कोरोनाचा फटका! मुंबई महापालिकेवर आली ही वेळ 

कोरोनाचा फटका! मुंबई महापालिकेवर आली ही वेळ
कोरोनाचा फटका! मुंबई महापालिकेवर आली ही वेळ

मुंबई : मुंबईचा तारणहार ठरलेली महापालिका सध्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले मुंबईकरांसाठीचे विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता पालिकेला विविध बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी मोडाव्या लागण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
 
कोरोना पूर्वी मुंबई महापालिका आर्थिक मंदीच्या संकटात होती. कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करणा-या मुंबई महापालिकेला आता कोरोनामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. विकासकामांना कात्री लावून आर्थिक बजेट रुळावर आणण्यासाठी कसरत पालिकेला करावी लागली. कोरोनामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पालिकेचे मोठे प्रकल्पही रखडले आहेत. ते प्रकल्प पूर्ण करणे महत्वाचे आहे. त्यासाठी विविध बँकांतील पालिकेच्या ठेवी मोडण्याची वेळ पालिकेवर आली आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. जीसटी लागू झाल्यानंतर पालिकेला जकाततून मिळणाऱ्या सात हजार कोटी रुपयांवर पालिकेला पाणी सोडावे लागले. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीवर प्रशासनाने भर दिला आहे. 

पालिकेला दरवर्षी मालमत्ता करपोटी साडे पाच हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत असतो. कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. लॉकडाऊनमुळे हा थकलेला मालमत्ता कर वसूल करणे हा महसूल वाढीचा मोठा पर्याय असून त्याचा आता पालिका विचार करीत आहे. 

आतापर्यंत थकलेला मालमता कर वसूल करताना पालिकेची दमछाक झाली आहे. त्यात आर्थिक मंदीचा फटका पालिकेला सहन करावा लागतो आहे. महसूल वाढीसाठी विविध पर्याय शोधत असतानाच कोरोनासारखा जीवघेण्या संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोना आटोक्यात येताच पालिकेची संपूर्ण यंत्रणा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे आधीच आर्थिक  गणित कोलमडलेले असताना कोरोनाने त्यात भर टाकली आहे. सध्या विकासकामांवर त्याचा आणखी परिणाम झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे सद्या पाणी, मलनीःसारण यासह अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवण्यात आली असून इतर कामे बंद ठेवण्यात आली आहेत. आगामी काळात विकासाचे मोठे प्रकल्प हाती घेताना पालिकेला आर्थिक चणचण निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे विकासकामांसाठी पालिकेला मुदत ठेवी मोडण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. 

79 हजार कोटींच्या ठेवी
पालिकेच्या विविध बँकांमध्ये 79 हजार कोटींच्या ठेवी आहेत. विविध बँकांमध्ये ही रक्कम मुदत ठेवींवर 15 महिन्यांसाठी ठेवण्यात आली आहे. या रकमेवर महापालिकेला सध्या सात टक्के व्याज मिळत आहे. विविध कर स्वरूपात जमा होणाऱ्या वार्षिक उत्पन्नाची भर यात पडत असते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत यामध्ये 12 हजार कोटींची वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com