मुंबईत मद्याची ऑनलाईन विक्री थांबणार? वाचा उच्च न्यायालयाने काय दिलाय निर्णय

मुंबईत मद्याची ऑनलाईन विक्री थांबणार? वाचा उच्च न्यायालयाने काय दिलाय निर्णय

मुंबई- कोरोनाचा प्रार्दुभाव मुंबई शहरात जास्त आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. तसंच गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे बरेच आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडीही विस्कटली आहे. म्हणूनच राज्यासह मुंबईची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारनं ऑनलाईन मद्यविक्रीचा निर्णय घेतला. मुंबई शहर रेड झोनमध्ये असल्यानं याआधी येथे ऑनलाईन मद्यविक्रीला मनाई होती. पण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासठी मुंबईतही परवानगी देण्यात आली. दरम्यान, आता मुंबईत ऑनलाईन मद्यविक्री थांबवण्यासाठी उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.

मुंबईत महापालिकेच्या आदेशानंतर मद्यविक्री ऑनलाईन करण्याची पद्धत खूप जिकीरीचे आहे आणि ती सुरक्षितही नाही. त्यामुळे मुंबई पालिकेचा आदेश रद्द करावा, असं म्हणत ही ऑनलाईन मद्यविक्री तात्काळ रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र वाईन मर्चंट्स असोसिएशननं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. ही विनंती मुंबई उच्च न्यायालयानं नाकारली आहे. 

दुकानांवरील थेट विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कालावधीचा परवानाशुल्क परत मिळायला हवा, या दुकानदारांच्या मागणीविषयी महापालिका आयुक्तांनी योग्य तो निर्णय द्यावा, असे निर्देशही न्या. नितीन जामदार आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने दिलेत.

महाराष्ट्र वाईन मर्चंट्स असोसिएशननं अॅड. चरणजीत चंदरपॉल यांच्यामार्फत याप्रश्नी तातडीची याचिका दाखल केली होती. जवळपास मुंबईसारखीच परिस्थिती पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये आहे. त्या जिल्ह्यांमध्ये थेट दुकानात जाऊन मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मुंबईत दुकानांतील विक्रीवर महापालिकेनं अनावश्यक निर्बंध घातलेत. पुणे नाशिकप्रमाणे मुंबईतही अशी परवानगी मिळायला हवी. मद्याची ऑनलाइन विक्री करण्यात अनेक अडचणी येत असून घरपोच विक्री असुरक्षित असल्याचं याचिकेत म्हटलं होतं. 

या घरपोच विक्रीत सोशल डिस्टन्सिंगचेही दुष्परिणामही संभवतात. त्यामुळे थेट विक्रीवर बंदी घालून ऑनलाईन विक्रीची मुभा देणारा महापालिकेचा २२ मे रोजीचा आदेश रद्द करावा, अशी विनंती असोसिएशनने याचिकेत केली होती. मात्र असोसिएशनची ही विनंती उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं फेटाळून लावली आहे. 

महापालिकेनं घेतलेला हा धोरणात्मक निर्णय आहे. अशा निर्णयामागे वेगवेगळी कारणे कारणीभूत असून कालांतराने संबंधित परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्यानुसार निर्णयातही बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे महापालिकेच्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असं निरीक्षण नोंदवून खंडपीठाने असोसिएशनची तातडीची विनंती फेटाळली.

असे आहेत ऑनलाईन मद्यविक्रीचे नियम आणि अटी 

जिल्हा प्रशासनाने मद्य विक्रीस परवानगी दिलेल्या जिल्ह्यातच ऑनलाईन मद्य विक्री करता येणार आहे. तुमचा जिल्हा जर रेड झोनमध्ये असेल तर त्या जिल्ह्यात मद्यविक्री होणार नाही. घरपोच मद्यसेवा देण्याची जबाबदारी सर्वस्वी दुकानदारावर असणार आहे. घरपोच सेवा देणारे कामगार यांची वैद्यकीय तपासणी करुन ते वैद्यकीयदृष्टया पूर्णपणे पात्र ठरल्यासच त्यांना विभागातर्फे तसे ओळखपत्र देण्यात येईल. संबंधित घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांना मास्क, हेड कॅप, हातमोजे, हॅन्ड सॅनिटायझर आणि वारंवार हातमोजे निर्जतुक करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईडचाचा वापर करणं अनिवार्य आहे.
घरपोच सेवा देणाऱ्या प्रत्येक दुकानात जास्तीत जास्त 10 कामगाराच काम करतील. सरकारच्या आदेशानुसार सदयस्थितीत घरपोच मद्यसेवा ही कोविड-19 /लॉकडऊन कालावधीच करताच लागू असेल.

मद्य बाळगणे, वाहतूक करणे इ. मद्यसेवन परवान्यातील तरतूदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची संबंधित दुकानदारांनी दक्षता घ्यावयाची आहे. सरकारचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणं दुकानदार, Delivary boy आणि ग्राहकास बंधनकारक असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com