दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

हुसेनी दुर्घटना 

 • सहा मजल्यांची 117 वर्षे जुनी इमारत 
 • इमारतीखाली 40 दबले गेल्याची शक्‍यता 
 • अग्निशामक दल, एनडीआरएफचे मदतकार्य सुरू 
 • बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे 
 • मृतदेहांची ओळख पटण्यात अडचणी 
 • पावसामुळे इमारत कोसळल्याचा अंदाज 
 • इमारतीतील शिशुवर्गाला सुटी असल्याने चिमुकल्यांचा जीव वाचला 
 • समूह विकास योजनेअंतर्गत इमारतीचा पुनर्विकास नियोजित 
 • काही महिन्यांपूर्वी इमारत खाली करण्याची म्हाडाची रहिवाशांना नोटीस 
 • नजीकचे संक्रमण शिबिर देण्याची रहिवाशांची होती मागणी 
 • मृतांच्या नातेवाइकांची जे. जे. रुग्णालयात गर्दी 

मुंबई : दक्षिण मुंबईतल्या पाकमोडिया स्ट्रीटवरील "हुसैनी' ही 117 वर्षांपूर्वीची सहा मजली इमारत गुरुवारी (ता. 31) सकाळी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 21 रहिवाशांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका गर्भवतीचा समावेश आहे. 

मुंबईत मंगळवारी (ता. 29) झालेल्या धुवाधार पावसामुळे ही इमारत कोसळली, असा प्राथमिक अंदाज आहे. या इमारतीत भरणाऱ्या शिशुवर्गास गणेशोत्सवाची सुटी असल्याने अनर्थ टळला. सकाळी साडेआठच्या सुमारास इमारतीतील काही खोल्यांच्या छताचा भाग कोसळत असल्याचे रहिवाशांना आढळल्याने त्यांनी आरडाओरडा केला. तो ऐकून अनेक रहिवासी इमारतीबाहेर धावले. त्यापैकी काही सुखरूप बाहेर पडले; तर काहींवर काळाने घाला घातला. 

इमारत कोसळल्याची माहिती समजताच अग्निशामक दलाचे जवान दुर्घटनास्थळी आले. ढिगाऱ्याखाली 40 जण अडकल्याचा अंदाज होता. त्यामुळे मदतीसाठी "एनडीआरएफ'च्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांची पहिली तुकडी पावणेदहाच्या सुमारास आली. "एनडीआरएफ' आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्याला सुरवात केली. त्यांनी ढिगाऱ्याखालून सात रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले. चिंचोळ्या गल्ल्या आणि बघ्यांची गर्दी यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. 

ही उपकरप्राप्त इमारत 2011 मध्ये पाडण्याचे आदेश "म्हाडा'ने दिले होते. सैफी बुऱ्हानी ट्रस्टतर्फे राबवण्यात येणाऱ्या समूह विकास योजनेअंतर्गत (क्‍लस्टर डेव्हलपमेंट) तिचा पुनर्विकास करण्यात येणार होता. इमारत रिकामी करण्याची नोटीस तेथील रहिवाशांना काही महिन्यांपूर्वीच पाठवण्यात आली होती; तरीही रहिवाशांनी संक्रमण शिबिरांत जाण्यास नकार दिला होता. इमारतीच्याच परिसरातील संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली होती. रहिवाशांना चुनाभट्टी येथे स्थलांतरित करण्यात येणार होते. परंतु मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. "म्हाडा'च्या अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची चौकशी केल्यानंतर इमारत कोसळण्याचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, पालिका आयुक्त अजोय मेहता, आमदार अमिन पटेल, समाजवादी पक्षाचे नगरसेवक रहिस शेख आदींनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. 

अनर्थ टळला 
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खासगी शिशुवर्ग भरतो. त्याला गणेशोत्सवाची सुटी असल्याने मोठा अनर्थ टळला. तळमजल्यावरील मिठाईच्या कारखान्यात काम करणारे तीन कामगार ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती होती. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.मृतांच्या नातेवाइकांनी जे.जे.च्या शवागाराबाहेर गर्दी केली होती. अनेक मृतदेह ओळखण्यापलीकडे आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड जात आहे. रात्री उशिरापर्यंत तीन मृतदेहांची ओळख पटलेली नव्हती. जुजन हसन आरसीवाला या रुग्णाला जे. जे. रुग्णालयातून सैफी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

  मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश 
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून दुर्घटनेची माहिती घेतली आणि जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे त्यांनी दुर्घटनेच्या सचिव स्तरावरील चौकशीचेही आदेश दिले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

  Web Title: mumbai news 21 deaths in building collapse