कुलगुरुपदासाठी पुन्हा चार जुने चेहरे चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदावरून डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर कुलगुरुपदाचे दावेदार कोण, असा प्रश्‍न आहे. डॉ. सुहास पेडणेकर, डॉ. विभा सुराणा, डॉ. नीरज हातेकर आणि डॉ. नरेशचंद्र या जुन्या चेहऱ्यांचीच चर्चा अधिक आहे. कुलगुरुपद नियुक्ती प्रक्रियेला दीड महिना लागणार आहे. तोपर्यंत प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनाच विद्यापीठाची धुरा वाहावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डॉ. सुहास पेडणेकर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगुरुपदासाठी रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांचे नाव आघाडीवर आहे. यापूर्वीही डॉ. पेडणेकर यांचे नाव चर्चेत होते. रुईयाला मिळालेला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा आणि सत्ताधारी पक्षाशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे डॉ. पेडणेकर यांच्या नियुक्तीची शक्‍यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. डॉ. पेडणेकर यांनी विद्यापीठ प्रशासनावर कधीही काम केलेले नाही. विद्यापीठाच्या समितीवरही काम केल्याचा अनुभव त्यांच्याकडे नाही. त्यामुळे पेडणेकर यांची नियुक्ती झाल्यास विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभारावर ते कितपत वचक ठेवतील, असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे.

डॉ. विभा सुराणा
मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागाच्या प्रमुख डॉ. विभा सुराणा यांचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. परदेशी भाषांवरील प्रभुत्व आणि विद्यापीठातील प्रशासकीय कारभाराची त्यांना असलेली माहिती पाहता डॉ. सुराणांची नियुक्ती कुलगुरुपदावर होऊ शकते, असे म्हटले जाते.

डॉ. नीरज हातेकर
मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ऍण्ड पब्लिक पॉलिसी या विभागाचे प्रमुख डॉ. नीरज हातेकर कुलगुरुपदाचे मोठे दावेदार मानले जातात. विद्यापीठ प्रशासनातील कामाचा दांडगा अनुभव ही डॉ. हातेकरांची जमेची बाजू आहे; परंतु ते वादग्रस्त विधानांसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत शंका व्यक्त होत आहे.

डॉ. नरेशचंद्र
डॉ. नरेशचंद्र विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरुपद आहे. माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर आणि डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध, प्राध्यापक वर्तुळातला त्यांचा वावर, यामुळे ते या पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे मानले जाते; परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांशी त्यांचे संबंध हा त्यांच्या मार्गातील अडथळा असल्याचे सांगण्यात येते.

डॉ. देशमुखांना परदेशाचे वेध
डॉ. संजय देशमुख यांची कुलगुरुपदावरून हकालपट्टी झाली असली तरी त्यांनी जीवन विज्ञान या विभागातील प्राध्यापकपदाचा राजीनामा दिलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. देशमुख परदेशातील विद्यापीठांच्या संपर्कात आहेत. ते शिकवण्यासाठी परदेशी जाण्यास उत्सुक आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: mumbai news 4 old person for vice chancellor