अपघात रोखण्यासाठी पुरेशा कायद्यांचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या परिषदेतील माहिती

रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या परिषदेतील माहिती
मुंबई - वाहतुकीशी निगडित मृत्यू आणि वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी जगातील 85 टक्‍के देशांमध्ये पुरेसे कायदेच नाहीत. त्यामुळेच 20 ते 25 दशलक्ष अपघात घडतात आणि 1.3 दशलक्ष मृत्यू होतात, याकडे ब्लुमबर्ग फिलॅन्थ्रॉपिजने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या परिषदेत लक्ष वेधण्यात आले.

वाहतुकीशी संबंधित 90 टक्‍के दुर्घटना कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये घडतात, अशी माहितीही या परिषदेत देण्यात आली. मुंबईत झालेल्या चर्चासत्रात अनेक देशांतील तज्ज्ञ तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ब्लुमबर्ग फिलॅन्थ्रॉपिजने रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांसाठी 2007 पासून आतापर्यंत 259 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. 66 हजारांहून अधिक लोकांना रस्त्यावरील सुरक्षा उपाययोजनांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे; तर रस्ते सुरक्षा उपक्रमांमुळे 1 लाख 25 हजार लोकांचे प्राण वाचले आहेत, असा दावा ब्लुमबर्ग फिलॅन्थ्रॉपिजच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांचे संचालक डॉ. केली हॅनिंग यांनी केला. उपग्रहाच्या आधारे (जीओ टॅग) अपघाती ठिकाणांची नोंद करून तसेच त्याची पार्श्‍वभूमी शोधून त्याचा अभ्यास अहवाल तयार करण्यावरही ब्लुमबर्ग फिलॅन्थ्रॉपिज भर देत आहेत.

Web Title: mumbai news accident control Lack of adequate legislation