सदोष विमान इंजिनांच्या तपासणीचे काय झाले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई - विमान सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या काही विमानांमध्ये असलेल्या सदोष प्रॅट आणि व्हिटनी 1100 इंजिनच्या तपासणीबाबत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने काय अंमलबजावणी केली, अशी विचारणा शुक्रवारी (ता. 23) मुंबई उच्च न्यायालयाने केली.

सदोष इंजिनांमुळे विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोचत आहे, असा दावा करणारी जनहित याचिका स्थानिक नागरिक हरीश अगरवाल यांनी केली आहे. त्यावर न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. केंद्र सरकारने केवळ निर्देश देऊन तपासणी करणे किंवा त्याचे प्रमाणपत्र देणे म्हणजे तपासणी होणार नाही, असेही खंडपीठाने सुनावले आहे. तज्ज्ञांचे मत घेऊन इंजिनांची तपासणी करावी आणि ते चालविण्यास योग्य आहे की नाही, याचा सविस्तर अहवाल नागरी हवाई मंत्रालयाने घ्यायला हवा. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, असेही न्यायालयाने बजावले आहे.

विमानांतील सर्व इंजिनांची तपासणी होत असून, बदलही केले जात आहेत, असे इंडिगो एअरलाइन्सने न्यायालयात सांगितले. इंडिगो आणि गो एअर कंपन्यांच्या काही विमानांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. कंपनीसह सरकारने यासंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी 2 एप्रिलला होणार आहे.

Web Title: mumbai news aeroplane engine cheaking