चार वर्षानंतर पोलिसांना आली जाग, डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

चार वर्षानंतर पोलिसांना आली जाग, डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलिस शिपाई गोरक्ष नरसाळे यांच्या मृत्यूच्या चार वर्षानंतर अखेर याप्रकरणी नागपाडा पोलिस रुग्णालयातील दोन डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थंडी आणि तापामुळे 2017 मध्ये गोरक्षचा जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला होता. पण तत्पूर्वी त्याच्यावर नागपाडा पोलिस रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गोरक्षच्या कुटुंबियांनी केला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

गोरक्षचे वडील दत्ताराम गेनऊभाऊ नरसाळे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भादंवि कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ताराम नरसाळे व्यवसायाने शेतकरी असून अहमद नगर येथील पारनेर येथील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा पंचवीस वर्षीय गोरक्ष हा मुंबई पोलिस दलाच्या ताडदेव येथील एल-4 येथे तैनात होता. 1 सप्टेंबर, 2017 ला गोरक्षला थंडी-ताप असल्यामुळे तो नागपाडा येथील जनरल वॉर्डमध्ये भरती झाला होता.

3 सप्टेंबरला अचानक त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मेडिकल रेकॉर्डशिवाय त्याला तेथे भरती करण्यात आल्याच्या 10 मिनीटातच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती दत्ताराम नरसाळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. तसेच तत्कालीन वरीष्ठ पोलिस अधिका-यांकडेही याप्रकरणी तक्रार करून चौकशीची मागणी केली होती.

औषधांबाबत हलगर्जीपणा झाल्याची कुटुंबियांची तक्रार आहे. त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुरूवारी याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. याप्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत असून तपासासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. गोरक्ष हा खूप उत्साही तरूण होता. देशासाठी, कुटुंबियांसाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीने तो पोलिस दलात भरती झाला होता.

खडतर प्रवास करून शेतक-याचा मुलगा पोलिस झाला होता. पण त्या दिवशी अचानक त्याचा मृत्यू झाला, त्यामुळे सर्वच मित्र खूप दुःखी झालो होतो, असे गोरक्षच्या एका मित्राने सांगितले.

mumbai news after four long years mumbai police files case of negligence against doctor

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com