अखिलेश यादव, राम कदम बनले टपाल कर्मचारी

ऊर्मिला देठे 
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, शिवसेनेचे नेते राम कदम हे कांदिवली विभागातील 12 टपाल कार्यालयांत कार्यरत आहेत, हे सांगितले तर धक्का बसेल ना? पण असा बनाव करीत या टपाल कार्यालयांतील कंत्राटी कामगारांची मूळ नावे बदलून, त्यांच्या पगारात लाखोंचा गोलमाल अधिकाऱ्यांनी केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, शिवसेनेचे नेते राम कदम हे कांदिवली विभागातील 12 टपाल कार्यालयांत कार्यरत आहेत, हे सांगितले तर धक्का बसेल ना? पण असा बनाव करीत या टपाल कार्यालयांतील कंत्राटी कामगारांची मूळ नावे बदलून, त्यांच्या पगारात लाखोंचा गोलमाल अधिकाऱ्यांनी केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

अखिलेश यादव हे डिलिव्हरी बॉय आहेत... अण्णा हजारे यांना सात हजार पगार... या नोंदी गोरेगाव पूर्व येथील टपाल कार्यालयातील आहेत. या टपाल कार्यालयासह कांदिवली पश्‍चिम विभागीय 12 टपाल कार्यालयांत कंत्राटी पद्धतीने 250 तरुण काम करत होते. वर्षभर काम केल्यानंतर त्यांना सेवेत नियमित करण्याचा टपाल विभागाचा नियम आहे; परंतु या नियमात अडकू नये यासाठी येथील 12 अधिकाऱ्यांनी दर महिन्याला या कामगारांची नोंदवही बदलण्याचा प्रताप केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप भालेकर यांनी मिळवलेल्या कागदपत्रांतून अधिकाऱ्यांचा हा प्रताप उघड केला आहे. भालेकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या या कागदपत्रांच्या प्रती "सकाळ'ला मिळाल्या आहेत.

कांदिवली टपाल कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या टपाल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी नोंदवहीत फेरफार करत टपाल कर्मचाऱ्यांची नावे बदलत त्यांच्या नावाने मिळत असलेल्या पगाराचा मलिदा लुबाडला आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधीक्षक अभिषेक जैन आणि हिरेंद्र गुप्ता यांच्यासह 12 अधिकारी, कर्मचारी या गैरव्यवहाराला जबाबदार असल्याचा आरोप भालेकर यांनी केला आहे.

काही दिवस मूळ नावाने काम केल्यानंतर आपली नावे का बदलत आहेत, याबाबत कामगारांनी वरिष्ठांकडे विचारणा केली, तर नोकरी गमावावी लागेल, अशी भीती अधिकाऱ्यांनी त्यांना दाखवली. त्यामुळे कधी महिन्याला; तर कधी दहा-दहा दिवसांनी ही नावे बदलल्याचे संबंधित कंत्राटी तरुणांचे म्हणणे आहे. कामाची गरज असल्याने आणि दर महिन्याला ठराविक रक्कम पगार म्हणून मिळत असल्याने या तरुणांनी याविरोधात कधी तक्रार केली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते भालेराव यांच्या संपर्कात हे तरुण आल्यानंतर हा गैरव्यवहार उघड झाला. भालेकर यांनी याबाबत गोरेगाव वनराई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्त एस. जैन यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्या वेळी ते कधी बैठकीसाठी बाहेर गेले आहेत, तर कधी ते सुटीवर असल्याचे कारण सुरक्षारक्षक आणि टेलिफोन ऑपरेटरने दिले.

असा होतो भ्रष्टाचार
टपाल कार्यालयातील हा गैरव्यवहार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाच्या आणि कामाबाबतच्या नस्तींमध्ये (फाइल) वाढ केली. एका टपाल कार्यालयात समजा पाच कंत्राटी कामगार असतील, तर त्या ठिकाणी 10 जण काम करत आहेत असे भासवण्यात येते. त्यानंतर मुख्य कार्यालयाला या फाइल पाठवत वाढीव रकमेचा पगार मिळविला. त्यानंतर पगाराची रक्कम या कामगारांना वाटून वाढीव पैसे स्वतःकडे ठेवले. कंत्राटी कामगार अनिल सरगडे या तरुणाला कधी राहुल कांबळे, कधी शुभम; तर कधी अखिलेश यादव असे नाव दिले. भिवा कदमला रामगोपाल यादव असे नाव देण्यात आले. संजय गिजमला अण्णा हजारे हे नाव देण्यात आले; तर नितीन चाळकेचे नामकरण सुबोध भावे असे करण्यात आले.

Web Title: mumbai news akhilesh yadav, ram kadam post employee