आर्थर रोड तुरुंगात कैद्यांना हवाय वडापाव 

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई  - चिंचपोकळी येथील मुंबई मध्यवर्ती तुरुंगात (ऑर्थर रोड) वडापाव आणि मांसाहार मिळावा, याकरता प्रशासनाकडे कैदी सतत पाठपुरावा करत आहेत. दिल्लीतील तिहार तुरुंगातील कॅंटीनमध्ये वडापाव आणि मांसाहार मिळतो. यापूर्वी तिथे शिक्षा भोगलेल्या काही कैद्यांनी ऑर्थर रोड तुरुंगात ही मागणी लावून धरली आहे. 

मुंबई  - चिंचपोकळी येथील मुंबई मध्यवर्ती तुरुंगात (ऑर्थर रोड) वडापाव आणि मांसाहार मिळावा, याकरता प्रशासनाकडे कैदी सतत पाठपुरावा करत आहेत. दिल्लीतील तिहार तुरुंगातील कॅंटीनमध्ये वडापाव आणि मांसाहार मिळतो. यापूर्वी तिथे शिक्षा भोगलेल्या काही कैद्यांनी ऑर्थर रोड तुरुंगात ही मागणी लावून धरली आहे. 

ऑर्थर रोड तुरुंगात सध्या तेवीसशे कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यांना सकाळी न्याहारी आणि दोन वेळा चहा व जेवण मिळते. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार कैद्यांना अंडी दिली जातात. काही कैदी तरुण असून, त्यांना मिळणारे जेवण पुरेसे नसते. असे कैदी तुरुंग प्रशासनाकडून मिळणाऱ्या पैशांतून कॅंटीनमधून बिस्किटे, फरसाण विकत घेतात. सकाळी न्याहारीनंतर कैद्यांना न्यायालयात किंवा तपासण्यासाठी सरकारी रुग्णालयात नेले जाते. बराकीतून बाहेर पडल्यावर व परत येताना त्यांना भूक लागते; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना बाहेरील खाद्यपदार्थ दिले जात नाहीत. पोट भरलेले राहावे यासाठी हे कैदी वडापाव खात असत. पूर्वी तुरुंगातील कॅंटीनमध्ये वडापाव दोन रुपयांत मिळत असे. आठवड्यातून एक दिवस कैद्यांना मांसाहारही मिळत असे. कॅंटीनमधील स्वतंत्र भटारखान्यात हे पदार्थ तयार होत असत; पण काही कारणांमुळे वडापाव आणि मांसाहारावर आता बंदी घालण्यात आली आहे. 

मांसाहाराअभावी वाढतो चिडचिडेपणा 
तुरुंगातील 60 टक्के कैदी अधूनमधून मांसाहार करणारे आहेत. त्यांना दररोज शाकाहारी जेवण आवडत नाही. परिणामी ते चिडचिडे होत असल्याचे समजते. कैद्यांना पौष्टिक खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी तुरुंग प्रशासन प्रयत्न करत होते. त्यासाठी तुरुंगात सर्वेक्षणही करण्यात आले होते; मात्र काही अडचणींमुळे हे बारगळल्याचे समजते. 

कल्याणमधील आधारवाडी तुरुंगातून दोन कैदी नुकतेच पळून गेले. याची तुरुंग प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ऑर्थर रोड तुरुंगात गंभीर गुन्ह्यांतील कैदी आहेत. पाच महिन्यांत येथील पाच कैदी पळून गेले आहेत. आता या तुरुंगाच्या संरक्षक भिंतीवर काटेरी तारांचे कुंपण केले जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कैद्यांवर नजर ठेवली जात आहे. 
हर्षद अहिरराव, तुरुंग अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती तुरुंग (ऑर्थर रोड)

Web Title: mumbai news Arthur Road Jail Prisoners vada pav