शेवटचा दरोडा ठरला अखेरचाच

शेवटचा दरोडा ठरला अखेरचाच

नवी मुंबई - बॅंक ऑफ बडोदाच्या सानपाडा शाखेतील लॉकर रूमवर टाकलेला फिल्मी स्टाईलचा दरोड्याची तब्बल २१ दिवसांनी उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. हरियानातील सोनिपत येथे भुयार खोदून टाकलेल्या दरोड्याचा आरोपींनी बारकाईने अभ्यास करून सानपाड्यात दरोडा टाकला. सानपाड्यात आयुष्यातील शेवटचा दरोडा टाकून आयुष्यभर आरामात जगण्याचा आरोपींचा मनसुबा होता. दरम्यान, या प्रकरणातील ११ आरोपींकडून साडेपाच किलो सोन्याच्या दागिन्यांसह परकीय चलन व रोकडही ताब्यात घेण्यात आली आहे.

राज्यात प्रथमच तीन ते चार गाळे सोडून भुयार खोदून टाकलेल्या दरोड्यामुळे खळबळ उडाली होती. या गुन्ह्याने नवी मुंबई पोलिसही चक्रावून गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी १० पथके तयार केली होती. पोलिसांच्या मिळालेल्या बॅंकेबाहेरील सीसी टीव्ही चित्रणातून बॅंकेबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर या वाहनांचा माग काढून तपास केला. अखेर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हाजीद अली सबदर अली मिर्जा बेग ऊर्फ अज्जू ऊर्फ लंगडा, श्रावण कृष्णा हेगडे ऊर्फ संतोष कदम ऊर्फ काल्या, मोमीन खान ऊर्फ पिंटू व अंजन महांती ऊर्फ रंजन यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून घाटकोपर-असल्फा व्हिलेज येथे दरोड्याचा कट रचल्याचे उघड झाले. मिर्जा बेगकडून सोने खरेदी करणारा सराफ राजेंद्र वाघ याला मालेगावातून पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांना ७४० ग्रॅम सोने मिळाले आहे, तर मिर्जाबेगचा साथीदार मोईनुद्दीन सिराजमिया शेख याला हावडा येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडे गुन्ह्यात वापरलेली इर्टींगा कार व साडेआठ हजार रुपये मिळाले होते.

पोलिसांनी मोईनुद्दीनची पत्नी सहनाजबी शेख हिच्याकडून साडेसहा लाख रुपये जप्त केले, तर केवळ उत्तर प्रदेशातून खोदकामासाठी आलेल्या कमलेश व शुभम यांच्याकडून एक लाख २७ हजार २०७ रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. उत्तर प्रदेशातील कामगार जुम्मन शेख याच्या घरातून पोलिसांनी खोदकामातील हत्यारे जप्त केली, तर मुंबईतील शिवाजीनगर येथील मेहरुनिसा शादाब सय्यद ऊर्फ सोनिया हिच्याकडून पोलिसांना तब्बल ७० लाख रुपयांचे २ किलो ८०० ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात यश आले.

हरियानातील भुयारी दरोड्याचा मुख्य आरोपी हाजीद अली याने अभ्यास केला होता. त्यानंतर त्याने बॅंक ऑफ बडोद्यावर दरोड्याची तयारी केली. बॅंकेतील लॉकर रूमवर आयुष्यातील शेवटचा दरोडा टाकायचा. या दरोड्यातील लुटीवर आयुष्यभर जगायचे, अशी योजना हाजीदने आखली होती, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com