भय इथले संपत नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

बेलापूर - सीबीडी सेक्‍टर २१ आणि २२ मधील आयकर कॉलनीतील सिडकोने बांधलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील रहिवासी सतत मृत्यूच्या छायेत वावरत आहेत. येथे घरातील छतांचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आयकर कॉलनीमधील घरे सिडकोने खासगी मालक सदस्यांच्या सोसायटीकडे चार महिन्यांपूर्वी हस्तांतरित करून यातून हात झटकले, असा आरोप नागरिक करीत आहेत. स्ट्रक्‍चरल ऑडिट केले नसल्याने या इमारती धोकादायक बनल्या असतानाही पालिकेच्या यादीत त्यांची नोंद झालेली नाही.

सीबीडी सेक्‍टर २१ आणि २२ मधील आयकर कॉलनीमधील सुमारे ४०० घरे रिकामी आहेत. तेथील भिंतींवर गवत व झुडपे उगवली असून, काही ठिकाणी पडझडही झाली आहे. यामुळे येथील अनेक इमारती बकाल बनल्या आहेत. अस्वच्छता आणि गर्दुल्ल्यांचा विळखा असलेल्या या कॉलनीला मार्केट आणि शाळा यांच्या गैरसोईंचा सामना करावा लागत होता. २५ वर्षांपूर्वीच्या या वसाहतीमधील इमारतींना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. इमारतीच्या भिंतींचे प्लास्टर निघाले आहे. बीम आणि कॉलमला तडे गेले आहेत. आता घरांच्या स्लॅबचे प्लास्टर पडण्यास सुरुवात झाली आहे. १० ऑगस्टला रात्री बिल्डिंग नंबर १८ रूम नंबर २ मधील पांचाळ यांच्या घरात स्लॅबचे प्लास्टर कोसळून तिघे जखमी झाले होते. येथील अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. या कॉलनीत ८०० पेक्षा जास्त सदनिका आहेत. आयकर विभागाच्या घरांमध्ये २६ कर्मचारी राहत असून, ४०० हून अधिक घरे रिकामी आहेत. एमएमआरडीएच्या १८, कस्टमच्या ३०, महापालिकेच्या सहा आणि १४० खासगी मालकीच्या सदनिका या वसाहतीत आहेत. खासगी मालकीच्या सोसायटींचे सिडकोने चार महिन्यांपूर्वी हस्तांतरण केले आहे. या इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले नसल्याने त्या धोकादायक असूनही तशी नोंद पालिकेकडे नसल्याने येथील रहिवाशांची कोंडी झाली आहे.

आयकर कॉलनीमधील संबंधित विभागाने आणि नागरिकांनी इमारतींचे स्ट्रक्‍चर ऑडिट करून पालिकेला अहवाल सादर केल्यावर धोकादायक, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य, डागडुजीकरून राहण्याजोगी अशी वर्गवारी केली जाते. अहवाल सादर न झाल्याने आयकर कॉलनीमधील इमारतींचा पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत समावेश झालेला नाही.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

Web Title: mumbai news belapur cbd