उरणमध्ये काळा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई  - राज्यभरात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे रविवारी (ता. ८) उरणमधील नागरिकांना आश्‍चर्याचा धक्काच दिला. येथे दोन दिवसांपासून काळा पाऊस पडत असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मुंबईतील बुचर बेटावरील डिझेलच्या टाकीला लागलेल्या आगीमुळे काळा पाऊस पडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बुचर बेटावरील तेलाच्या टाकीवर वीज कोसळून शुक्रवारी (ता. ६) आग लागली होती. ही आग अद्याप पूर्णपणे विझलेली नाही. आगीमुळे उठणारे धुराचे लोट आकाशात दूरवर पसरले होते. त्यामुळे उरणसह नवी मुंबई परिसरात सायंकाळी धुराचे ढग येऊन भरदुपारीच अंधार झाला होता. शनिवारी सायंकाळी उरण परिसरात जोरदार पाऊस झाला. सुमारे अर्धा तास मोरा, नागाव, पिरवाडी परिसराला पावसाने झोडपले; मात्र या पावसाने रहिवाशांना धक्काच दिला. सकाळी घराच्या छपराखाली ठेवलेल्या भांड्यांमध्ये काळे पाणी गोळा झाल्याचे रविवारी सकाळी काही नागरिकांनी पाहिले. त्यामुळे काळा पाऊस झाल्याचे लक्षात आले. रविवारी सायंकाळीही काळा पाऊस पडल्याने नागरिक संभ्रमात पडले. काही घरांच्या छपरावर काळा थर तयार होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

मेच्या सुरुवातीला काळा पाऊस होण्याची शक्‍यता असते; मात्र उरणमध्ये पडलेला पाऊस बुचर बेटावरील दुर्घटनेमुळे झाला असावा, अशी शक्‍यता काही पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली. 

आज पाहणी
उरण परिसरात काळा पाऊस पडल्याच्या घटनेबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एपीसीबी) अनभिज्ञ होते. याबाबत माहिती मिळाल्याने मंगळवारी (ता. १०) पाहणी करण्यासाठी आपण जाणार आहोत, अशी माहिती एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांनी दिली.

Web Title: mumbai news black rain in uran